‘छत्रपती शाहूराजे, आम्हाला माफ करा’

jaysinghpur
jaysinghpur

जयसिंगपूर - शहर शताब्दी वर्षात वर्षभर राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करण्याचा निर्धार नगरपालिकेने केला होता. पालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी शाहू आणि ताराराणी आघाडीला एकाच उंचीवर नेऊन ठेवताना शहर विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या; मात्र शहर शताब्दी प्रारंभाचा कार्यक्रम वगळता यासाठी पुन्हा कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. 

निवडणुकीच्या तोंडावर कार्यक्रम घेऊन नेत्यांना सत्तेची संधी साधायची होती का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनाच विसर पडल्याने ‘शाहूराजे, आम्हाला माफ करा’ म्हणण्याची वेळ आता नागरिकांवरच आली आहे. 

२१ सप्टेंबर २०१६ पासून शहर शताब्दी वर्षाला प्रारंभ झाला. पालिका निवडणुकीच्या तोंडावरच शताब्दी महोत्सव आल्याने संधीसाधूंनी हा एक दुग्धशर्करा योग म्हणूनच याकडे पाहिले. शताब्दी महोत्सव पथ्यावर पाडण्यासाठी नियोजनाच्या बैठका झाल्या. येथूनच खऱ्या राजकारणाला सुरवात झाली. मर्जीतल्यांना बैठकीचे निमंत्रण द्यायचे आणि इतरांना अंधारात ठेवायचे यावरून बराच खलही झाला.

पालिकेतील उपनगराध्यक्ष केबिनच्या विस्तारावरून शाहू आणि ताराराणी आघाडीत चांगलेच वाजत आहे. याचे परिणाम शहराच्या विकासकामांवर होणार हे कोणा भविष्यवेत्त्यानेही सांगण्याची गरज नाही. उपनगराध्यक्ष केत्त्बिनचा विषय शहराच्या विकासापेक्षा मोठा आहे का? मग आजवरच्या उपनगराध्यक्षांना सुसज्ज केबिन का केली नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. 

राजर्षी शाहूंनी वसविलेल्या या शहराचा शताब्दी महोत्सव सुरू असताना राज्यकर्त्यांना याचा विसर पडतोच कसा, हा महत्त्वाचा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. नव्याने पालिकेत आलेल्या ताराराणी आघाडीलाही याप्रश्‍न सोयरसुतक नसल्याचेच जाणवत आहे. शहर शताब्दीच्या पार्श्‍वभूमीवर साधी चर्चा गेल्या काही दिवसांत झाली नाही. 

 उपनगराध्यक्ष केबिनवरून वादळ उठविण्यापेक्षा शहरात आज अनेक प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. केबिनची गरज नसल्याचे एका बाजूला सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला राजकारण करायचे असे न करता शहराच्या विकासात योगदान दिले पाहिजे, असाही सूर आता हळूहळू शहरात निघू लागला आहे. ताराराणी आघाडीने उपनगराध्यक्ष केबिनप्रश्‍नी मोठ्या मनाने संमती द्यायला हवी होती. कायद्यावर बोट ठेवण्यापेक्षा सहमतीतून विकास साधण्याची गरज आहे. नागरिकांनी दोन्ही आघाड्यांना आपले काम दाखविण्याची समान संधी दिली असून, त्याचे सोने करायला हवे.

संघर्ष नको, विकास हवा...
पंधरा वर्षे सत्ता भोगूनही नागरिकांनी शाहू आघाडीला काठावरचे बहुमत दिले. काय चुकले याचे आत्मपरीक्षण नेत्यांना करणे आवश्‍यक असताना उपनगराध्यक्ष केबिनचा वाद डोक्‍यावर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ताराराणी आघाडीनेही या किरकोळ प्रश्‍नाचे इतके भांडवल करण्याची गरज नव्हती. दोन्ही आघाड्यांना नागरिकांनी समान पातळीवर ठेवताना विकासाची अपेक्षा केली आहे. यामध्ये सरस ठरणाराच भविष्यात पालिकेत राहणार आहे. प्रशासन, नागरिक आणि नगरसेवक आशा पातळीवर काम करताना विकास साधण्याचे मोठे आव्हान नगराध्यक्षा डॉ. सौ. नीता माने यांच्यापुढे असणार आहे. त्यामुळे किरकोळ वाद लांबविण्यापेक्षा त्या त्यावेळी ते सोडविणे हेच त्यांच्यासाठी चांगले असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com