इच्छुकांना ग्रामपंचायतीकडून स्वच्छतागृह प्रमाणपत्र बंधनकारक

गणेश शिंदे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

जयसिंगपूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायतीकडून स्वच्छतागृह प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. स्वच्छतागृह नसणाऱ्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह वापरत असल्याचा ग्रामसभेचा ठरावही सक्तीचा आहे. प्रमाणपत्र न जोडणाऱ्या संभाव्य उमेदवारांना तक्रार झाल्यास निवडणुकीपूर्वीच मैदान सोडण्याचीही वेळ येऊ शकते.

जयसिंगपूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायतीकडून स्वच्छतागृह प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. स्वच्छतागृह नसणाऱ्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह वापरत असल्याचा ग्रामसभेचा ठरावही सक्तीचा आहे. प्रमाणपत्र न जोडणाऱ्या संभाव्य उमेदवारांना तक्रार झाल्यास निवडणुकीपूर्वीच मैदान सोडण्याचीही वेळ येऊ शकते.

यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असा आदेशही काढला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कागदपत्रांबरोबर स्वच्छतागृह असल्याचे व ते वापरत असल्याचे प्रमाणपत्रही दाखल करणे आवश्‍यक असणार आहे. जी व्यक्ती मालकीच्या घरात असून, त्या घरात स्वच्छतागृह आहे व ती अशा स्वच्छतागृहाचा नियमितपणे वापर करत आहे किंवा तिच्या मालकीच्या घरात राहात नाही; पण त्याठिकाणी स्वच्छतागृह असून, त्याचा नियमित वापर करते. तसेच घरात स्वच्छतागृह नाही, तरीही सार्वजनिक स्वच्छतागृहाचा नियमितपणे वापर करत आहे, असे प्रमाणित करणाऱ्या ग्रामसेवकांच्या ठरावासोबत पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक असणार आहे. शासनाचे अप्पर सचिवांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी विहित वेळेत ग्रामसभेतून हे प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून इच्छुकांना प्रमाणपत्र देण्यासाठी नियोजन करावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भावी लोकप्रतिनिधींनाही स्वच्छतेचे महत्त्व कळावे, यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. शासनाकडून भविष्यात स्वच्छतेसाठी लोकसहभागातून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्यानेच भावी लोकप्रतिनिधींना स्वच्छतागृहाची सक्ती केली आहे.

...तर सहायक गटविकास अधिकाऱ्यांचा निर्णय ग्राह्य
इच्छुक उमेदवारांकडून शौचालयाच्या प्रमाणपत्रासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत, तसेच अपवादात्मक परिस्थितीत ग्रामसभेचे आयोजन होऊ शकले नाही, तर अशा परिस्थितीत सहायक गटविकास अधिकारी ग्रामसेवकाच्या शिफारशीवरून शौचालयाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करू शकतात, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: jaysingpur zp election