दोन हजार तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला

दोन हजार तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला

चितळीत "डीसीसी'च्या शाखेत धाडसी चोरीत 21 लाखांची रक्कमही लंपास
कलेढोण - चितळी (ता. खटाव) महादेव मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चोरट्यांनी काल (ता. 20) रात्री धाडसी चोरी केली. बॅंकेच्या स्ट्रॉंग रूममधील लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून चोरट्यांनी 21 लाखांची रोख रक्कम व 52 लाख 50 हजार रुपये किमतीचे दोन हजार तोळे सोन्याचे दागिने असा एकून 74 लाखांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी बॅंकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज्‌ रेकॉर्ड करणारे कनेक्‍टिविटी रॅकही चोरून नेल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळी येथे गावाच्या पश्‍चिम बाजूस चितळी सोसायटीच्या इमारतीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा आहे. आज सकाळी सोसायटीचे अध्यक्ष सतीश कदम यांनी सोसायटी इमारतीवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी का येत नाही? हे पाहण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांना जिल्हा बॅंकेच्या पाठीमागील बाजूकडील खिडकी उचकटल्याचे दिसून आल्यानंतर बॅंकेत चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर बॅंक कर्मचारी मोहन कुंभार यांनी शाखेचे व्यवस्थापक भाग्यवंत पवार यांना घटनेची कल्पना दिली. घटनेची माहिती समजताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बॅंकेच्या पाठीमागील लोखंडी खिडकी गॅस कटरच्या मदतीने तोडून शाखेत प्रवेश केला. त्यानंतर बॅंकेतील लोखंडी स्ट्रॉंगरूमजवळ असणारा सायरन व सीसीटीव्ही फुटेज्‌ घेणाऱ्या कॅमेऱ्यांच्या केबल तोडत स्ट्रॉंग रूमची कुलपे तोडली. त्यानंतर चोरट्यांनी स्ट्रॉंग रूममधील सुमारे 20 लाख 95 हजार रोकड व सोने तारणासाठी बॅंकेत ठेवलेले 1975.50 तोळे वजनाचे 52 लाख 43 हजार किमतीचे दागिने असा एकूण 73 लाख 98 हजारांचा ऐवज लंपास केला.

चोरट्यांचा "टेक्‍निकल' दरोडा
चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश करताच कनेक्‍टिविटी रॅकला हात घालत त्याच्या केबल तोडल्या. काही केबल स्वीचमधून व्यवस्थित सोडविल्या. रॅकमधील एनव्हीआर, मोडेम, राउटर, स्वीच चोरून नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सायरन वाजू नये व बॅंकेच्या समोरील संदेशवहन करणाऱ्या टॉवरच्या केबलही तोडल्या. त्यामुळे या चोरीत एखादा "टेक्‍निकल चोरटा' असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हा टेक्‍निकल दरोडा समजला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com