२५ कोटी मिळाले... आता नियोजन हवे

२५ कोटी मिळाले... आता नियोजन हवे

जोतिबा डोंगर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानतर्फे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली; पण आज हा आराखडा राबविताना सर्व बाबींचा काटेकोरपणे विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये करण्यात येणारी सर्व विकासकामे दीर्घकाळ टिकणारी असावीत त्या दृष्टीने शासकीय यंत्रणेचे नियोजन हवे. सर्व कामे करताना गावातील ग्रामस्थ, पुजारी, लोकप्रतिनिधी यांना विश्‍वासात घेणे फार गरजेचे आहे.

असा बनला विकास आराखडा
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर भाविकांची संख्या वाढत आहे. भाविकांसाठी मात्र सुविधा अल्प प्रमाणात आहेत. १९९० मध्ये शासनाने जोतिबाचा विकास करण्यासाठी ‘सुंदर जोतिबा योजना’ आखली, पण वीस वर्षांत ही योजना पूर्णपणे रेंगाळली. काही कामे तर अगदी कागदावरच राहिली आणि डोंगर मात्र विकासाच्या प्रतीक्षेत राहिला. पुणे विभागाचे तत्कालीन आयुक्त प्रभाकर देशमुख हे डोंगरावर दर्शनासाठी आले. त्यांनी भाविकांच्या अडचणी पाहिल्या. २०१३-१४ मध्ये त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, भाविक यांची विशेष बैठक १५४ कोटींचा आराखडा तयार केला व तो मंजुरीसाठी ठेवला. यंदा हा आराखडा टप्प्या-टप्प्याने मंजूर होऊ लागलाय. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २५ कोटी मंजूर झालेत. ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे.

विद्युततारा भूमिगत
जोतिबा डोंगरावर सर्वत्र विद्युततारांचे मोठे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे ठीकठिकाणी सासनकाठ्यांना अडथळे निर्माण होतात. परिणामी विद्युत तारा तुटण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डोंगरावरील सर्व विद्युत तारा भूमिगत करणे गरजेचे आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी वेळोवेळी मागणी उचलून धरली आहे. तसेच वीज वितरण कंपनीकडेही पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

दर्शन मंडप
जोतिबा डोंगरावर दर्शन मंडपच नसल्यामुळे भाविकांना उन्हातच मुख्य मंदिराभोवती दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. परिणामी उन्हामुळे भाविकांना त्रास होतो. भाविकांची वर्षानुवर्षे ही मागणी केवळ कागदावरच आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवर दर्शन मंडप गरजेचा आहे.

दर्शन मंडप कोठे असावा
जोतिबा मंदिर परिसरात चोपडाई बाव नावाचा जलाशय आहे. त्या शेजारी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची जागा आहे. त्या शेजारी राखीव जागेत सहज पाच-सहा मजली इमारत उभी राहू शकते.

अतिक्रमणे
जोतिबा डोंगरावर वर्षानुवर्षे अतिक्रमणे अगदी जैसे थे आहेत. ही अतिक्रमणे काढण्यासठी शासकीय यंत्रणेला यशच आलेले नाही. यात्रा काळात ही तात्पुरती काढली जातात. पुन्ही ती मोठ्या जोमाने उभा राहतात. शासकीय पातळीवर याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अतिक्रमणाच्या विळख्यातून डोंगर मुक्त होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.

ड्रेनेज व्यवस्था
जोतिबा गावातील सर्व सांडपाणी गावाच्या बाहेर काढणे गरजेचे आहे. डोंगरावरील ८० ते ९० टक्के सांडपाणी येथील धनगरवाड्यानजीकच्या ‘वताड’ भागातून एखाद्या धबधब्याप्रमाणे कोसळते. हे पाणी गावाबाहेर काढून घनकचरा प्रकल्प उभा करणे गरजेचे आहे.

पार्किंग व्यवस्था
डोंगरावर कोठेही सर्रास वाहने लावली जातात. त्यामुळे येणा-जाणाऱ्या भाविकांना अडथळा निर्माण होतो. वाहन पार्किंग ठेकेदार वाहन जागा भाडे घेतात. पण एखादी गाडी चोरीस गेली तर हमी गेत नाहीत. पार्किंग व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने करावी.

वाहन कर बंद केव्हा?
डोंगरावर माणशी दोन रुपये व वाहनासाठी पाच, दहा, वीस पन्नास असा कर घेतला जातो. देवाच्या दारातसुद्धा हात  जोडण्यासठी पैसे द्यावे लागत असल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा कर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भक्त निवास
डोंगरावर येणाऱ्या भाविकांना  राहण्यासाठी प्रशस्त भक्त निवास नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. त्यांना पुजाऱ्यांच्या घरी राहण्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी एखादे भव्य यात्री निवास उभा करणे गरजेचे आहे. या ठिकाणी भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा देता येतील.

दर्शन मंडपात हव्यात या सुविधा

वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार केंद्र,
स्वच्छतागृहे, मुताऱ्यांची सोय

स्वच्छ पाणीपुरवठा सोय.

पोलिस कक्ष, महाप्रसाद सोय
मंडपात स्क्रीन लावून दर्शनाची सोय
 

जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पहिल्या टप्प्यातील विकासकामांना २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जोतिबा डोंगरचे रूप हळूहळू पालटणार आहे. येणाऱ्या भाविकांना मुबलक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. सर्वच विकासकामे दर्जेदार  व टिकाऊ होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. भविष्यात भाविकांना जोतिबाचा डोंगर सुंदर दिसणार आहे.
- डॉ. रिया पंकज सांगळे, सरपंच, जोतिबा डोंगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com