भरलेले तळे पाहण्याचा आनंद मोठा, जलसंधारणाच्या कामाला यश

malvadi
malvadi

मलवडी - भरलेलं तळं पाहण्याचा आनंद किती मोठा असू शकतो हे दुष्काळी माणमधील तालुक्यातील जनताच सांगू शकते. असाच आनंद साजरा करण्याचं भाग्य श्रीपालवणच्या (ता. माण) ग्रामस्थांना मिळालं. तनिष्कांच्या मागणीवरुन सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून ग्राम तलावातील गाळ काढल्यानंतर वरुणराजाने चांगली साथ दिल्याने सध्या ग्राम तलावात चांगला पाणी साठा झाला आहे.

श्रीपालवण हे माणच्या पश्चिमेकडील डोंगरावरील एक छोटंसं व टुमदार गाव. या गावच्या स्नुषा व सध्या मुंबई येथील तनिष्का गटाच्या अध्यक्ष फुलन शिंदे यांनी श्रीपालवण येथे तनिष्का गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तनिष्का गट स्थापन केल्यानंतर या गटाच्या माध्यमातून दारुबंदी, एस. टी. सेवा, शेतकर्यांना मार्गदर्शन असे विधायक उपक्रम राबविण्यात आले. येथील महिलांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. ग्राम तलावात गाळ साठल्याने त्याची साठवण क्षमता घटली होती. तलावातील गाळ काढल्यास त्याची साठवण क्षमता वाढून गावचा पाणी प्रश्न बर्यापैकी सुटेल हे लक्षात आल्याने त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली.

तनिष्कांनी 'सकाळ रिलिफ फंडातून' मदतीची मागणी केली. सकाळ ने त्यांची मागणी तत्काळ मान्य केली. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावातील गाळ काढण्यात आला. तसेच तलावाच्या बाजूने वाहून जाणारे पाणी तलावात आणण्यासाठी चर खोदण्यात आली. गाळ काढण्याचे काम झाल्यावर पावसाने कृपादृष्टी दाखवली. चांगला पाऊस झाल्याने तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला. ग्रामस्थांनी लाडू वाटून, जलपुजन करुन आनंद साजरा केला. तसेच येथील हणमंत काळे यांनी तलावात मत्स्य बीज सोडले. यावेळी सर्व तनिष्का सदस्या, हणमंत काळे, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सकाळ रिलिफ फंडाने केलेल्या मदतीमुळे आमच्या ग्राम तलावातील गाळ आम्ही काढू शकलो. तलावात खुप पाणी साठा झाला असून आता आम्हाला पाण्याची कमतरता जाणवणार नाही." सुशिला चव्हाण, सरपंच व तनिष्का समन्वयक श्रीपालवण

माणमधील जलसंधारणाच्या चळवळीला बळ देण्याचं काम सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून तनिष्कांनी नेहमीच केले आहे. माणमधील जलसंधारणाच्या चळवळीत सकाळचं मोठं पाठबळ लाभलं आहे. दुष्काळी माणच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी सकाळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आजपर्यंत माणमधील साधारण पंधरा गावांना तब्बल तीस लाखांचा निधी सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना देण्यात आला आहे. यापुढे तनिष्कांच्या मागणीवरुन अजून निधी देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com