जोतिबा मंदिर विकासासाठी 25 कोटी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पर्यटन विकासाअंतर्गत भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर तसेच पन्हाळगडावर तयार करण्यात येणारा लाईट व साउंड शो हा दर्जेदार, आकर्षक आणि देखणा करण्याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री 

कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 कोटींच्या तर माणगाव परिसर विकास आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील 2 कोटी, पंचगंगा घाट विकास आराखड्यास 4 कोटी 78 लाख, शाहू जन्मस्थळ विकास 2 कोटी 10 लाख, पन्हाळा लाईट व साउंड शोसाठी 4 कोटी 50 लाखांच्या निधीस राज्य शासनाने मान्यता दिली असून, ही पर्यटन विकासाची कामे वेळेत, दर्जेदार करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केल्या. 

पर्यटनविषयक जिल्हास्तरीय समितीची बैठक सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी परिसर विकासासाठी 155 कोटींचा आराखडा शासनाला सादर केला असून पहिल्या टप्प्यात 25 कोटींच्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, पार्किंग, टॉयलेट कॉम्प्लेक्‍स, सांडपाणी आदी कामांचा समावेश असून, ही कामे देवस्थान समितीच्या माध्यमातून होणार आहेत. अंडरग्राउंड वायरिंग, भक्त निवास आदींचा 4.50 कोटींचा सुधारित प्रस्ताव तत्काळ सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. माणगाव परिसर विकासाच्या 5 कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात 2 कोटींच्या निधीस मान्यता दिली असून यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील भाषणावर आधारित "होलोग्राफिक शो' तसेच समाजमंदिराची सुधारणा ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय विकास आराखडा यावर या वेळी चर्चा झाली. संग्रहालयाचा 13 कोटी 42 लाखांचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 10 लाखास मान्यता मिळाली आहे. ही कामे दर्जेदार, गुणात्मक व वेळेत करण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. बैठकीत पंचगंगा घाट विकासाचा 26 कोटी 85 लाखांचा बृहत आराखडा तयार केला असून पहिल्या टप्प्यात 4 कोटी 78 लाखांच्या कामास मान्यता दिली आहे. 
पन्हाळगड येथे लाईट व साउंड शोसाठी 4 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर झाला असून यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली. पन्हाळ्यावर लाईट आणि साउंड शोचे काम दर्जेदार आणि गुणात्मक करण्यासह पन्हाळगडाचा इंटिग्रेटेड प्लॅन तयार करून एक मिशन म्हणून पन्हाळ्याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना बैठकीत केली. या वेळी मसाई पठार, काळम्मावाडी धरणावरील बगीचा विकास, राधानगरी, येळवण जुगाई मंदिर आदींच्या विकासाबाबतही चर्चा झाली. बैठकीत बड्याचीवाडी येथील काळभैरव मंदिर परिसराचा विकास 7 लाख, पट्टणकोडोली येथील भक्त निवासासाठी 8 लाख, कलानंदिगड परिसर विकासासाठी 20 लाख, तळेमाऊली मंदिर विकासासाठी 40 लाख, किल्ले सामानगड विकासासाठी 10 लाखांच्या आराखड्यांना मंजुरी मिळाल्याचेही सांगितले. 

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत केले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, श्री. वेदपाठक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ल, आर्किटेक्‍ट अमरजा निंबाळकर, सहायक नियोजन अधिकारी भूषण देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Jyotiba temple 25 million grant for the development