जोतिबा यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

कोल्हापूर  - जोतिबा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मंदिर परिसरासह गर्दीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, मनोरे, निर्भयासह भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पत्रकारांना सांगितले. 

कोल्हापूर  - जोतिबा यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मंदिर परिसरासह गर्दीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, मनोरे, निर्भयासह भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पत्रकारांना सांगितले. 

श्री. तांबडे म्हणाले, ""जोतिबा यात्रेला देशभरातील लाखो भाविकांची गर्दी होती. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने गेली महिनाभर कंबर कसली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक बंदोबस्ताची पूर्ण तयारी झाली आहे. उद्या (ता. 8) पासून हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महिला, वृद्ध आणि लहान मुले चेंगराचेंगरीत सापडू नयेत, अगर घातपातासारखे प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष नियोजन केले आहे. मंदिरात सोडताना प्रत्येक भाविकाची मेटल व हॅन्ड डिटेक्‍टरच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. मंदिर व मंदिराच्या मार्गावरील गर्दीच्या ठिकाणी 43 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तीन मनोऱ्यांवरून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे. गर्दीत हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी स्वतंत्र कक्ष नेमला आहे. या कक्षाची व छेडछाडीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी निर्भया पथकाकडे सोपवली आहे. 

पार्किंगची 20 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. अग्रक्रमाने भाविकांना वाहने पार्किंग करण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथम येणाऱ्या भाविकाला मंदिरापर्यंत कमी अंतर चालत जावे लागणार आहे. भाविकांना पार्किंगपासून मंदिर परिसरात सोडण्यासाठी 40 बसही प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिरात जाण्यासाठी दर्शन रांगेची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर पालखी प्रदर्शनासाठी आवश्‍यक जागेची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालखीवेळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळणार आहे. यात्रा संपेपर्यंत हा बंदोबस्त तैनात राहील. 

असा आहे बंदोबस्त - 
पोलिस अधीक्षक - 1 
अपर पोलिस अधीक्षक - 1 
पोलिस उपअधीक्षक - 5 
पोलिस निरीक्षक - 17 
सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक - 80 
पोलिस कर्मचारी - 550 
महिला पोलिस कर्मचारी - 150 
वाहतूक पोलिस - 220 
होमगार्ड (पुरुष) - 250 
होमगार्ड (महिला) - 100 
निर्भया, भरारी पथक - 1 
राज्य राखीव दलाची तुकडी - 1 
सीसीटीव्ही - 45 ठिकाणी 
मनोरे - 3 

Web Title: jyotiba yatra tight security