पालिका क्षेत्रातही ‘कृषी’च्या सर्व योजना - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कडेगाव - नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहोत. तसेच येथे दारूबंदीसाठी महिलांना सर्वतोपरी मदत करणार असून याकामी भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी उभा राहू, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

कडेगाव - नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या सर्व योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहोत. तसेच येथे दारूबंदीसाठी महिलांना सर्वतोपरी मदत करणार असून याकामी भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी उभा राहू, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

येथे लिबर्टी गणेश मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद पर्व’ अंतर्गत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मंत्री सदाभाऊ खोत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर,तहसीलदार अर्चना शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागांतर्गत विविध योजना राबवत आहोत. शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अवधी लागतो आहे परंतु शेतकऱ्यांनी कसलीही काळजी करू नये. अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरीही काही शेतकरी कर्जमाफी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले तर सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून होत नाहीत तोपर्यंत मुदतवाढ दिली जाईल. लोकांना पिण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सध्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेता ताकारी, टेंभू, म्हैसाळ या योजना सुरू केल्या आहेत. पॉली हाऊससाठी जिल्ह्याला चार कोटी रुपये मिळाले आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनेचे राज्याचे ५०० कोटीचे बजेट आहे. त्यापैकी मी व संग्रामसिंह देशमुख दोघांनी प्रयत्न करून २५० कोटी रुपये जिल्ह्यासाठी आणले आहेत. 

जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, लिबर्टी गणेश मंडळाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्‍याचा मोठा विकास केला जाईल. सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे पेयजल योजनेसाठी २५० कोटी रुपये मिळाले आहेत. कडेगाव दारूबंदीसाठी आपला पाठींबा आहे परंतु राज्य पातळीवर याबाबत सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न करावेत. 

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांनी स्वागत केले. कडेगाव दारूबंदीसाठी अधिकारी वर्ग जुमानत नसल्याची तक्रारी महिला वर्गाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन महिलांनी मंत्री खोत यांना दिले. आरोग्य अधिकारी डॉ. पत्की, तालुका कृषी अधिकारी नामदेव पिंजारी, मुख्याधिकारी चरण कोल्हे, राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, उदयकुमार देशमुख, हाजी शौकत पटेल, शांता घाडगे, अश्विनी वेल्हाळ, सिंधू रास्कर, श्रीजय देशमुख, रवी पालकर, हनीफ आत्तार, अश्रफ तांबोळी, संदीप गायकवाड उपस्थित होते. धनंजय देशमुख यांनी आभार मानले.