गोरगरिबांची कामे करताना गटतट बघत नाही - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

कागल - ‘‘गोरगरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कागलमध्ये १००२ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात क वर्ग पातळीवर अशा प्रकारचे काम करणारी कागल ही एकमेव पालिका आहे. गोरगरिबांची कामे करताना आम्ही गटतट बघत नाही. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या व्यक्तीने घरकुलाबाबत तक्रार केली याचे दु:ख होते,’’ अशी खंत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली. 

कागल नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल्या घरकुलांच्या २०८ घरांचे वाटप सोडत पद्धतीने आज झाले. येथील शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी होत्या. या वेळी आमदार हसन मुश्रीफ बोलत होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘कागल शहरातील कुणीही घराविना राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न असते. ताबा दिलेल्या घरकुलातील अपुरे काम ताबेदाराच्या नजरेसमोरच पालिका करून देणार आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी घरे ताब्यात देण्याअगोदरच नासधूस केली, हे बरे नाही. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे हा आमचा ध्यास आहे. या घरकुलाखेरीज रमाई योजना, पंतप्रधान आवास योजना याद्वारे पाच हजार घरांची निर्मिती करू. मिळालेल्या घरकुलात गोरगरिबांना सुखशांती लाभो, त्यांची भरभराट होवो. त्यांचे दारिद्र्य नष्ट होवो.’’

भैया माने म्हणाले, ‘‘घरकुल योजनेसंदर्भात आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्लीपर्यंत अनेक फेऱ्या केल्या. याबाबत कुठलेही राजकारण न करणारे मोठे ताकदीचे नेते आहेत. त्यामुळेच गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती होत आहे.’’ 

स्वागत उपनगराध्यक्ष नितीन दिंडे व प्रास्ताविक पक्षप्रतोद प्रवीण काळबर यांनी केले. या वेळी मुख्याधिकारी टिना गवळी, प्रकाश गाडेकर, रमेश माळी यांची मनोगते झाली. या वेळी शामराव पाटील, आशा जगदाळे, तसेच नगरसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.