एक तपाची ‘कैलास बॅंड शाळा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

सोलापूर - अशोक चौकात पोलिस पेट्रोल पंपालगतच्या नारळ बनातून रोज सकाळी सॅक्‍सोफोन आणि क्‍लॉर्नेटची धून कानी पडते. काय बरं चालतं इथं? कान टवकारतात, काही तरुण ही वाद्य वाजवण्याचा सराव करत असल्याचं दिसतं... अशा तरुणांना गेली १२ वर्षे कैलास गायकवाड नावाचा माणूस वाद्य शिकवतोय. हौस म्हणून नव्हे तर पोलिस बॅंडमध्ये सरकारी कर्मचारी म्हणून भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची फौज इथे शिकते. कैलासरावांची ही ‘बॅंड शाळा’ एक तपाची झालीय.

मूळ सोलापूरकर असलेल्या कैलास गायकवाड यांचा उदरनिर्वाह खासगी बॅंड पथकात काम करून चालायचा. पट्टीचे वादक म्हणून त्यांचा त्या काळात परिचय होता. आर्थिक तंगी कालही होती अन्‌ आजही आहे. पण, गेल्या १२ वर्षांत त्यांच्या कलेनं त्यांनी अनेक तरुणांच्या आयुष्याचं कल्याण केलं. पोलिसांच्या बॅंड पथकात भरतीसाठी वाद्य शिकवण्याचे काम ते करतात. २००४ पासून आजअखेर त्यांच्याकडे शिकलेल्या ३८ जणांना पोलिस दलात नोकरी मिळाली. सध्या १५ तरुण त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. सकाळी नऊच्या सुमारास सारे जमतात. नारळाच्या बनात पडलेले नारळ फोडून त्यावर ताव मारतात. तोच नाश्‍ता. पुढे दीड-दोन तासांहून अधिक सराव चालतो. पोलिस दलाच्या पडक्‍या जागेत हे काम चालते. कैलासमामांना सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांचे विद्यार्थी व्यक्त करतात.

सोलापूर शहरात एका कोपऱ्यात पडक्‍या जागेत चाललेली ही बॅंड शाळा भाकरी मिळवून देणारी आहे. तिथे ना डोनेशन लागतं, ना जातीचं प्रमाणपत्र, ना कुणाची शिफारस. या शिका, वाजवा अन्‌ कमवा..!

Web Title: kailash band school