कलेढोण गणात भाजपने सेनेला गुंडाळले? 

कलेढोण गणात भाजपने सेनेला गुंडाळले? 

मायणी - जिल्हा परिषदेच्या मायणी गटातील कलेढोण गणात भाजप व शिवसेनेने स्वबळाचे रणसिंग फुंकून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, भाजप नेते व कार्यकर्त्यांनी राजकीय हवा काढून घेत शिवसेना नेत्यांनी फुगवलेला फुगाच फोडला. सेना नेत्यांना गुंडाळून त्यांच्याच हस्ते विखळे (ता. खटाव) येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यामुळे नेत्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, समर्थक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

कलेढोण गण इतर मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झाला आहे. तेथे सत्ताधारी राष्ट्रवादीमधून वैशाली माळी, भाजपमधून मेघा पुकळे, कॉंग्रेसमधून शर्मिला काशीद व शिवसेनेच्या वतीने रूपाली पिसे यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे गणात प्रथमच चौरंगी लढत होणार होती. स्थानिक नेत्यांनी आपापला गट शाबूत राहावास, यासाठी स्वतंत्र लढतीचे रणशिंग फुंकले आहे. शिवसेना व भाजपची राज्यात कोठेच युती होणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केले असले, तरी मायणी व निमसोड गटात भाजप व सेनेच्या नेत्यांनी युती केली. एकमेकांना मदत करण्याचे ठरवले. त्यासाठी कलेढोण गणाची जागा सेनेसाठी सोडण्याचे निश्‍चित केले. तेथील स्थानिक सेनानेते सुरेश शिंदे देतील त्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरले होते. त्यानंतर भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये बेबनाव होऊन स्वतंत्र उमेदवार देण्यात आले. उमेदवारी अर्जही स्वतंत्रपणे भरण्यात आले. परिणामी कलेढोण गणात प्रथमच चौरंगी लढत होण्याची शक्‍यता निर्माण झाली. सुरेश शिंदे यांचा कलेढोण व परिसरातील गावांत स्वतंत्र गट आहे. भाजप व सेना स्वतंत्रपणे लढल्यास भाजप उमेदवारांपुढील अडचणीत वाढच होऊ शकते, तर सत्ताधारी राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो याची खात्री पटल्याने राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी पुढाकार घेत शिवसेनेला गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू केला. राजकीय डावपेच टाकत अखेर सेना नेत्यांची हवा काढून घेण्यात आली. त्याशिवाय भाजपने घेतलेली भूमिका कशी योग्य आहे, हेही पटवून देण्यात भाजप नेते व प्रमुख कार्यकर्ते यशस्वी झाले. शिंदे यांचे मन वळवून शिवसेना पुरस्कृत उमेदवार रूपाली पिसे यांचा अर्ज काढून घेण्याची कबुली देताच भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे फुलले. अडथळ्यांच्या शर्यतीत वाटेतील पहिला काटा काढण्यात भाजप नेत्यांना यश आले. त्या आनंदाच्या भरातच त्यांनी विखळे फाट्यावर भाजपचे प्रचार व संपर्क कार्यालय उभे करून त्याचे उद्‌घाटनही शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com