फूटभर नाही ‘ओल’, कसे वाढणार ‘भूजल’?

अंकुश चव्हाण
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

खटाव तालुक्‍यात बंधारे, तलाव कोरडेच; मोठ्या पावसाची अपेक्षा

कलेढोण - पावसाळा सुरू झाल्यापासून खटाव तालुक्‍यात अपवादानेच मोठ्या पावसाने हजेरी लावली. केवळ भुरभुर पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत फूट-दोन फुटांपर्यंतच ओल निर्माण झाली नाही. त्यामुळे तालुक्‍यातील बंधारे व तलाव हे कोरडेच आहेत. भूजल पातळीत वाढ न झाल्याने शेतकरी चिंतीत असून आजही ते मोठ्या पावसाची अपेक्षा करत आहेत. 

खटाव तालुक्‍यात पावसाळा सुरू झाल्यापासून मोठ्या पावसाने पाठ फिरवली आहे. भुरभुर झालेल्या पावसामुळे जमिनीत केवळ फूट-दोन फूटच ओल निर्माण झाली आहे. त्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जमिनीतील ओलीवर पिकांनी मुळ्या धरल्या आहेत. पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल तसेच परिसरातील तलाव, ओढे व बंधारे हे अजूनही कोरडेच आहे. तालुक्‍यातील येरळा तलावात अपुरा तर मायणी, कानकात्रे, कटकाळी आदी तलावांत आजअखेर पाणीसाठा झालाच नाही.

समाधानकारक पाऊस न पडल्याने जमिनीत पाणी मुरले नाही, तर उन्हाळ्यात झालेल्या पाण्याच्या उपशामुळे तालुक्‍यातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तालुक्‍यात भुरभुरणाऱ्या पावसाने केवळ शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा तात्पुरता प्रश्न सुटला आहे. भविष्यात मोठ्या पावसाने हजेरी न लावल्यास जनतेला पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. खटाव तालुक्‍यातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी काढलेल्या बोअरवेल अद्याप कोरड्याच आहेत. भुरभुरणाऱ्या पावसात त्यांचा चार दिवस घसा ओला झाला. मात्र, त्या पुन्हा कोरड्या पडल्या आहेत. 

आजही शाश्‍वत पाणीपुरवठा नाहीच 
तालुक्‍यात टंचाईच्या काळात उरमोडी धरणातून येरळवाडी धरणात सोडण्यात येणारा पाणीपुरवठा वगळता कोणताही शाश्‍वत पाणीपुरवठा नाही. त्यातही वीज बिल प्रश्नामुळे ही योजना दरवर्षी अडचणीत येते. प्रशासनाने शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.