राजमातांचा इशारा जनतेच्या पथ्यावर?

Third-Eye
Third-Eye

विकासकाम कोणतं करायचं यापेक्षा ते कोणी करायचं, यावरून पालिकेतील सत्ताधाऱ्यांतील स्पर्धा जुनीच आहे. दस्तुरखुद्द उदयनराजेंनी सांगूनही त्यात सुधारणा दिसत नाही. सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचेच गांभीर्य त्यांचे पदाधिकारी, सदस्यांना राहिले नाही, असा संदेश समाजात जात आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी काल पालिका बैठकीत व्यक्त केलेला उद्वेग समजण्यासारखा आहे. पालिकेच्या कारभाराबद्दलची जनतेतील नाराजी राजमातांनी बरोबर ताडली. लोकांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहा, अन्यथा गणपतीचे विसर्जन होता होता तुमचंच विसर्जन होईल. राजमातांचा हा गर्भित इशारा सत्ताधारी कार्यकर्ते मनावर घेणार का, असा प्रश्‍न आहे. 

सातारा पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीअंतर्गत राजकारण सर्वश्रूत आहे. त्यात तसूभरही फरक पडला नसल्याने नव्याने याठिकाणी लिहिण्यासारखे काहीही नाही. यावर आघाडीचे सर्वेसर्वा उदयनराजे भोसले यांनी अनेकदा पदाधिकारी, सदस्यांची कानउघडणी केली आहे. साताऱ्यातील मनोमिलनाच्या दहा वर्षांत दोन्ही आघाड्या जितक्‍या एकरूप झाल्या होत्या, तितका समन्वय सातारा विकास आघाडीत अभावानेही पाहायला मिळत नाही. नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामात कोणाच्या ‘जेसीबी’ची सोय करायची, शाहू कलामंदिर नूतनीकरणाचे काम कोणाकडून करायचे... पालिकेतील चर्चांमधील अग्रस्थानी हेच विषय कायम राहिले आहेत, कायम आहेत. 

गणेशोत्सवात धोकादायक इमारत पाडण्यासाठी झालेला पालिकेचा खर्च चार वर्षांत वसूल करता आलेला नाही. शहरातील सार्वजनिक फलकांचे करार संपुष्टात आले आहेत. पालिकेच्या व्यापारी संकुलांतील गाळे लिलावाविना पडून आहेत. करंजे औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमित भूखंडधारकांचं घोंगडं अद्याप भिजत पडून आहे. जलतरण तलावाचे चार प्रस्ताव तयार झाले, पण एकही प्रत्यक्षात आला नाही. सर्वसामान्यांच्या मुलांना पोहायची सोय नाही. युनियन क्‍लबलगत आरक्षित जागा विकासासाठी ताब्यात घेता आलेली नाही. कोटेश्‍वर पुलावरील वाहतूक आठ-आठ महिने ठप्प आहे. आणखी किती महिने लागणार, कोणच सांगू शकत नाही. या प्रश्‍नांसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. पालिकेत हे होताना दिसत नाही. सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, अरुंद रस्ते, अतिक्रमणे आदी भैतिक कामांचे मूल्यमापन न केलेलेच बरे!

विकासाला हवी गती 
सातारकर पालिकेच्या कामावर नाराज आहेत, हा राजमातांनी काढलेला निष्कर्ष बरोबर आहे. केवळ टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या सांगण्यामागे तळमळ आहे. ‘लोकांमध्ये जावा, लोकांचे प्रश्‍न तुम्हाला समजतील. त्यांची सोडवणूक करा,’ हा सल्ला काल त्यांनी आपल्या आघाडी सदस्यांना दिला. त्यांचे हे नैतिकतेचे धडे कितपत पचनी पडतात. कुरबुरी बाजूला सारून विकासाच्या मंदावलेल्या वेगाला पुन्हा गती मिळणार का, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com