काझी वाडा परिसरातील गोदामाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अग्निशामक दलाचा बंब आल्यानंतर आग अटोक्यात आली. घरवजा छप्पराजवळ मोकळे आवार आहे. त्या आवारात सुकलेले गवत आहे. त्या गवताला सगळ्यात प्रथम आग लागली

कऱ्हाड : येथील आझाद चौकातील काझी वाडा परिसरात अचानक आग लागल्याने घरवजा गोदामातील साहित्य व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही आग दुपारी तीनच्या सुमारास लागली. इरफान काझी यांच्या मालकीचे छप्परात गोदाम होते. त्यात त्यांचा डंक, काही महत्वाची कागदपत्रे व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. 

स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अग्निशामक दलाचा बंब आल्यानंतर आग अटोक्यात आली. घरवजा छप्पराजवळ मोकळे आवार आहे. त्या आवारात सुकलेले गवत आहे. त्या गवताला सगळ्यात प्रथम आग लागली. ती आग सरकत त्या छप्परवजा घराला लागली. त्या घरात काझी यांचा डंक व संसारपयोगी साहित्य होते. त्याशिवाय मेडिकल दुकानदरांचे हिशोबाचे कागद व रॉ मटेरियल होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

छप्परात लाकडाचे साहित्य असल्याने आगीने पेट घेतला. धुराचे लोट पसरल्याने आग लागल्याचे लोकांच्या लक्षात आले. स्थानिक नागरिक तेथे धावले. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्याचवेळी काही लोकांनी अग्निशामक दलास बोलावले. 

काही मिनिटातच तेथे अग्निश्यामक दल पोचले. त्यांच्या मदतीने व स्थानिक लोकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली. त्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आगीत नुकसान किती झाले आहे, याची माहिती मिळू शकली नाही. तर आगीचे कारणही अद्यापही अस्पष्ट होते.

Web Title: Karad Kazi wada Area Godawn Huge Fire