कऱ्हाडला २२ इमारती धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कऱ्हाड - शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे नुकताच पूर्णत्वास आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतीची संख्या दहाने घटली आहे. काही धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून काहींची दुरुस्ती करण्यात आल्याने शहरात यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात शहरात २२ धोकादायक इमारती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना नोटीस देण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा पालिकेकडून सर्व्हे केला जातो. यंदाही तो करण्यात आला. विशेष म्हणजे यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाने सर्व्हेचे काम पूर्ण केले. अनेकदा पावसाळा सुरू झाला तरी या सर्व्हेसाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामध्ये शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा सर्व्हे होतो.

प्रामुख्याने सर्व्हे करताना गेल्यावर्षी नोटीस दिलेल्या जुन्या इमारतींची अवस्था व त्यात नव्याने काय भर पडली, याचा विचार करून सर्व्हे केला जातो. 

बहुतेकदा धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याचे पाहायला मिळते. यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या घटली आहे. गेल्यावर्षी धोकादायक इमारतींची संख्या ३२ होती. यंदा ती २२ पर्यंत खाली आली आहे. काही इमारती जमीनदोस्त करून नव्याने बांधकाम सुरू झाल्याने तर काही इमारतींची दुरुस्ती करण्यात आल्याने यंदा शहरात २२ इमारती धोकादायक उरल्या आहेत. त्यातही रविवार पेठेत एकही धोकादायक इमारत नसल्याचे दिसून येते. सर्वाधिक धोकादायक इमारती बुधवार, शुक्रवार, शनिवार पेठेत प्रत्येकी सहा आहेत. सर्व्हे पूर्णत्वास गेला असून, संबंधितांना धोकादायक इमारती उतरवून घेण्यासंदर्भात नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स