तीन पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील शेतीचा राज्यभर डंका

तीन पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील शेतीचा राज्यभर डंका

काशीळ/कऱ्हाड - महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जाहीर केलेल्या पुरस्कारांत सातारा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. त्यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी-दत्तात्रय पाटील (मांडवे, ता. खटाव), उद्यान पंडित-गणपत पार्टे (भिलार, ता. महाबळेश्वर) व कृषिभूषण (सेंद्रिय)-प्रदीप निकम (इंदोली, ता. कऱ्हाड) यांचा समावेश आहे. या प्रगतशील शेतकऱ्यांमुळे राज्यभरात जिल्ह्यातील शेतीचा डंका पुन्हा एकदा वाजला आहे. 

दत्तात्रय पाटील 
(शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार)

दुष्काळी खटाव तालुक्‍यातील मांडवे या गावातील दत्तात्रय पाटील हे कृतिशील शेतकरी. पाण्याशिवाय शेती नाही हे ओळखून त्यांनी सव्वादोन कोटी लिटर क्षमतेच्या दोन शेततळ्यांची निर्मिती केली आहे. त्यातील पाण्यावर त्यांनी शेती फुलवली. पाण्याचे महत्त्व जाणून त्यांनी अडीच एकर क्षेत्रातील डाळिंब बागेस डिफ्युजर तंत्राचा वापर केला आहे. तीन एकर क्षेत्रात द्राक्षबाग केलेली आहे. भाजीपाल्याच्या दरात शाश्‍वतता यावी यासाठी श्री. पाटील हे अनेक वर्षांपासून करार शेती करत आहेत. त्यामध्ये ढोबळी मिरची, ॲलोपिना मिरचीचा समावेश आहे. मिरचीचे वर्षातून दोन प्लॉट घेतात. मिरचीबरोबरच अगोरा वांग्याचे यशस्वी पीक घेतले जाते. फुलशेतीसाठी श्री. पाटील यांनी सव्वाएकर क्षेत्रात ग्रीन हाउस उभारले आहे. त्यात ऑर्चिड, लिमुनियम फुलांची शेती करतात. शेतीला पूरक म्हणून दोन्ही शेततळ्यांत मत्स्यपालन सुरू केले आहे. या शेतीबरोबर आल्याची शेती केली जात असून, एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांसाठी ॲग्रो क्‍लिनिक सुरू केले आहे. 

गणपत पार्टे 
(उद्यान पंडित पुरस्कार)

भिलार या पुस्तकांच्या गावातील गणपत पार्टे हे प्रगतशील शेतकरी. सातत्याने नवनवीन शोध व आधुनिक तसेच सेंद्रिय शेतीवर भर देणारे म्हणून त्यांची ओळख आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपावर होणारा भरमसाट खर्च कमी करण्यासाठी २० गुंठे ग्रीन हाउस उभे केले आहे. त्यात मातीविना शेती या संकल्पनेतून स्ट्रॉबेरीचे मातृवृक्ष आणून त्यात रोपांची निर्मिती करत ५० टक्के बचत करण्यात यश मिळवले आहे. स्ट्रॉबेरीचे उत्तम पॅकिंग व्हावे यासाठी स्वतःचे अत्याधुनिक पॅकिंग हाउस उभारले आहे. शेतीला पूरक आणि फायदेशीर असलेले मधमाक्षिका पालन केले जात आहे. सध्या त्यांच्याकडे २०० वर मधमक्षिका पेट्या आहेत. स्ट्रॉबेरीची थेट विक्री व शेतीला पूरक म्हणून शेतात कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे. त्यातून ४० टक्के स्ट्रॉबेरची थेट विक्री केली जात असल्याने दर चांगला मिळतो आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनातून चांगले अर्थाजन होत आहे. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी ६० शेतकऱ्यांचा ॲग्रो इंडिया ऑरगॅनिक गटाची स्थापना केली आहे. श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. गट, संस्थेच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. यातून अनेक शेतकरी आर्थिक सक्षम केले आहेत. 

प्रदीप निकम 
(कृषिभूषण पुरस्कार-सेंद्रिय शेती)

शेतीतून निघणारे उत्पन्न सकस आणि कसदार निघून विषमुक्त अन्न सर्वांना मिळावे, या हेतूने इंदोली (ता. कऱ्हाड) येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप निकम यांनी गेली २३ वर्षे सेंद्रिय शेतीची कास धरली. त्यातून त्यांनी शेतीतील प्रयोग करत अनुभव घेवून सेंद्रिय शेतीची विण घट्ट केली. शेतीसाठी फारसे खत लागते असे नाही. जरूरीएवढे शेणखत दिल्यास चांगली पिके घेता येतात, असे सांगून श्री. निकम म्हणाले, ‘मी १९९४ पासून सेंद्रिय शेती करत आहे.  अनुभवातून शिकताना शेतीत अनेक प्रयोग केले. वाळवीच्या वारुळाची माती एक किलो, बैलाचे शेण एक किलो आणि दोन लिटर म्हशीचे मूत्र आणि पन्नास ग्रॅम गूळ हे मिश्रण बीज प्रक्रियेस वापरले. त्यातून भात पिकात मिश्रपीक घेवडा, सोयाबीन ही पिके घेतली. भुईमूगात चवळी, मूग घेतला. शेवग्यात अंतरपीक झेंडू, वांगी, मेथी, चवळी केली. या सर्वांना ती बीजप्रकिया केली. त्यामध्ये कोणतेही खत न वापरता केवळ मुळाला सेंद्रिय खत भरीसाठी वापरले. त्याचबरोबर दर १५ दिवसांनी गोमूत्राची फवारणी केली. त्यावर पिके चांगली बहरल्याने सोयाबीन, उन्हाळी भुईमूग यातून भरघोस उत्पन्न मिळाले. ऊस पिकातूनही या प्रकारे चांगले उत्पादन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com