'उदयनराजेंचे काम स्वयंभू पद्धतीचे'

'उदयनराजेंचे काम स्वयंभू पद्धतीचे'

कऱ्हाड - खासदार उदयनराजे भोसले यांचे काम स्वयंभू पद्धतीचे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा ते त्यांच्यासोबत असतात. इतर वेळी त्यांना लोकसभेचे, तसेच अन्य मोठे व्याप असतात. त्यामुळे छोटे कार्यकर्ते आल्यावर ज्येष्ठ नेते पवार यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांना आमच्याबरोबर राहणे बरोबर वाटत नसावे. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात, असा खोचक टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगावला. 

जिल्ह्यात चाललेली राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीने वेगळ्या पद्धतीनेही चर्चेत आली असल्याबाबत अजित पवार यांना छेडले असता त्यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले. दरम्यान, नगरमधील हत्यांकाड प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा सुतरामही संबंध नसताना षडयंत्र करून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तत्पूर्वी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज येथे आली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, चित्रा वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘नगरमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या करणारा स्वत: पोलिसांसमोर शरण आला आहे. त्याने हे वैयक्तिक वाद, व्यवहारातून केले असल्याचे सांगूनही राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांना अटक करण्यात आली; पण या प्रकरणात ते निष्पाप आहेत. ज्यांची हत्या झाली त्यांचे कॉल डिटेल्स तपासा, हत्या करणाऱ्याचा व्यवसाय काय होता, याचा तपास व्हावा. यानंतर त्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध लागेल.’’ 

भुजबळांशेजारील कोठडी रिकामी असल्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्‍तव्याबाबत ते म्हणाले, ‘‘भाजप सत्तेत आल्यापासून त्यांनी आमच्या चौकशा लावल्या आहेत. संशयाच्या भोवऱ्यात राहणे योग्य वाटत नाही; पण एकदा लोकांनाही या चौकशीतून खरे काय ते कळेल.’’ 

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतचे शिवसेना मंत्र्यांच्या वक्तव्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘शिवसेना डबल गेम खेळते आहे. सत्तेत राहून निर्णय प्रक्रियेत सहभागी होते. मात्र एखादा निर्णय प्रमुखांना न आवडल्यास त्याविरोधात बोलायचे, असे त्यांचे तंत्र आहे.’’ या वेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनीही हल्लाबोल यात्रेबाबतही भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचे आमदार ठामच
जिल्ह्यातील दोन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप जिल्हाध्यक्षांनी केला होता. त्यावर २०१४ पासून आजच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सर्वच घटकांची मुस्कटदाबी होत आहे. त्यामुळेच हल्लाबोल यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील पक्षाचे आमदार हे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या विचारावर ठाम असणारे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा एकही आमदार कुठेही जाणार नाही, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com