गुन्हे दाखल न करता कागदोपत्री कारवाई!

गुन्हे दाखल न करता कागदोपत्री कारवाई!

कऱ्हाड - एखादी गरजू व्यक्ती गाठायची, तिची गरज ओळखून व्याजाने पैसे द्यायचे, की मग यांचा मीटर होतो सुरू. त्याला १५ ते २० टक्‍क्‍यांनी पैसे दिलेले असतात. त्यामुळे दर महिन्याचे व्याज घ्यायचे. एखादा महिना चुकला की, ते व्याज मुद्दलात वाढवून पुढच्या महिन्याचे व्याज वाढीव रकमेवर घेतले जाते. शहराच्या विविध भागात याच प्रकारची सावकारी करणाऱ्यांचे जणू पेव फुटले आहे. किमान १५ ते २० टक्‍क्‍यांनी पैसे दिले जातात. त्यात व्यापारी, नोकरदार किंवा उद्योजकांना हेरून पैसे वितरीत केले जात असल्याचा सर्रास प्रकार शहरात सुरू आहे. त्यातूनही एखाद्याने खासगी सावकारीच्या तगाद्यातून त्रास होत असल्याची तक्रार केली किंवा अर्ज दिलाच तर त्यावर पोलिस नाममात्र कारवाई करत आहेत. त्याबाबत गुन्हे दाखल न करता केवळ कागदोपत्री कारवाईची घोडी नाचवून सावकारांनाच हवे ते वातावरण तयार करण्याची प्रवृत्ती खात्यात वाढली आहे. 

शहराच्या विविध पेठेत काहाही काम न करणाऱ्या अनेक युवकांचा बाज सगळंच सांगून जातो. डोळ्यावर गॉगल, हातात महागड्या सोन्याच्या अंगठ्या व त्यांच्या अलिशान गाड्या त्यांच्या खासगी सावकरीच्या व्यवसायालाच वलयांकित करताना दिसतात. अनेक सावकारांनी त्यांची संपर्क कार्यालये काढून असे व्यवसाय थाटले आहेत. काही युवकांनी व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायाच स्वीकारला आहे. कमी कालावधीत जादा पैसे कमावण्याचा ‘शॉर्टकट’ म्हणून व्यवसायाकडे आकर्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्याजाने पैसे घेणाऱ्यांवर त्यांच्या दादागिरीसह त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शहरातील मोठे सावकार गल्लोगल्लीतील युवकांना व्याजाने पैसे फिरवण्यासाठी तीन ते पाच टक्‍क्‍यांनी फायनान्स करतात. ते युवक पुढे गरजू व्यापाऱ्याला किंवा 

गरजूला किमान १५ ते २० टक्‍क्‍यांनी पैसे फिरवतात. त्या व्यक्तीला निकड असते, म्हणून ती पैसे स्वीकारते. त्यानंतर त्या व्यक्तीला युवकांच्या दादागिरीला व पैशाच्या वसुलीच्या तगाद्याशी सामना करताना त्रास होताना दिसतो आहे. शहरासह तालुक्‍यातील किमान २० खासगी सावकारांवर जानेवारीपासून गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात १२ लोक शहरातील आहेत. शहरातील वय ३० ही न ओलांडणारे युवक अशा सावकारीचा व्यवसाय करण्यासाठी आकर्षित झाले आहेत. वास्तविक ‘शॉर्टकट’ने पैसे कमावण्याचे आकर्षण असल्याने ते युवक याकडे वळले आहेत. त्यामुळे त्या युवकांच्या हातात कमी वयात जादा पैसे आल्याने ते गुन्हेगारीकडेही वळाल्याचेही दिसत आहे.  

शहरातील अनेक छोटे व्यावसायिक सावकारांच्या जाळ्यात अडकले आहेत. मध्यंतरी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. त्या व्यापाऱ्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, त्यात सावकारीचा उल्लेख केला नाही. वास्तविक त्याला झालेली मारहाण वसुलीवरूनच झाली होती, त्याची शहरात चर्चा आहे. काही सावकार व्याजाने पैसे दिल्यानंतर त्या लोकांचे धनादेश घेत आहेत. त्यात उसने पैसे घेतल्याचा उल्लेख करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते व्याजाने घेतलेले पैसे असतात. पोलिस खटला दाखल होवू नये, म्हणून त्याला उसण्या पैशाचा मुलामा लावला जातो आहे. समाजात या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मात्र, पोलिस दप्तरी त्याच्या नोंदी ‘नील’ आहेत, याचेच आश्‍चर्य आहे. 

पोलिस पैसे घेऊन प्रकरणे करतात रफादफा!
 पोलिसांनी मध्यंतरी साठवर संशयित खासगी सावकारांकडे केवळ चौकशी केली. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाईच झाली नाही. पोलिसांकडे एखाद्याच्या नावाचा अर्ज गेला की, केवळ चौकशी करून त्या सावकाराला अभय दिले जाते. त्याच्यावर गुन्हा दाखल होताना दिसत नाही. असे महिन्याला डझनभर अर्ज पोलिस बाद ठरवून त्यावर नाममात्र कारवाईची कोगदोपत्री घोडी नाचवताना दिसत आहेत. सावकारांशी अनेक पोलिसांचे लागेबांधे असल्याने पैसे घेऊन ती प्रकरणे रफादफा केली जात आहेत. 

(क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com