इकडे गुन्हे करून तिकडे जायचे!

इकडे गुन्हे करून तिकडे जायचे!

कऱ्हाड - स्थानिक युवकांना भुरळ पाडायची अन्‌ त्यांना सोबत घेवून गुन्हे करण्याची पद्धत परराज्यातील संशयित करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या नव्याने रूजू पाहणाऱ्या या चोऱ्यांच्या ट्रेंडमुळे पोलिस खात्याचीही झोप उडवली आहे. अशा गुन्ह्यांची माहिती घेवून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी समन्वय साधूनच काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा संशयितांची हिस्ट्री सीट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 

स्थानिक युवकांना भुरळ पाडून परप्रांतीय संशयित गुन्हे करू लागले आहेत. पुणे, मुंबईत असा ट्रेंड होता. मात्र, आता पश्‍चिम महाराष्ट्रात मूळ धरू लागला आहे. कोल्हापूर व सांगलीला झालेल्या चोरीच्या काही गुन्ह्यांत असे प्रकार उघडकीस आले आहेत. वडगावच्या दरोड्याच्या गुन्ह्यातही हा प्रकार समोर आला. पोलिसांनी शिताफीने टोळीला गजाआड केले. त्यात अटक झालेल्यांपैकी चौघे जण हरियाणाचे आहेत. तर अक्षय भरत कावरे (वय २१, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) व अन्य एक अल्पवयीन आहे. कावरे हा पक्षीय संघटनेचा पदाधिकारी आहे. या संयुक्त टोळक्‍याने केलेले कृत्य अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्याकडून रोकड, पाच मोबाईल, पिस्तूल, दोन तलवारी, चाकू, दोन बुलेट जप्त केल्या आहेत. येथील लॉजवर दुचाकी व दुसऱ्या लुटीतील रक्कमही जप्त केली. चार दिवसांपूर्वी याच पद्धतीने कडेगावचा पेट्रोल पंप लुटला होता. त्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याशिवाय कोल्हापूर भागातही काही चोऱ्यांची कबुली ते देत आहेत. चोरी करण्यापूर्वी भागाची रेकी करण्याची त्यांची पद्धत होती. येथेही त्यांनी तेच केले. कडेगाव भागातील काही लोक दिल्ली व हरियाणा येथे व्यवसायानिमित्त आहेत. त्यामुळे त्या भागातील युवकांचा तिकडच्या लोकांशी संपर्क येतो. तसाच कावरेचा ईश्वर सैनीशी संपर्क झाला. सैनीला गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याकडे येथील युवक आकर्षित झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या डोक्‍यात कल्पना आकार घेवू लागल्या. त्यातूनच चोऱ्या झाल्या.  वडगावच्या दरोड्यावेळचा त्यांचा प्लॅन फसला अन्‌ ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.  

परराज्यात गुन्हे करून फरार व्हायचे, इकडे गुन्हे करून तिकडे जायचे, असाच शिरस्ता काही संशयित करत आहेत. त्यासाठी ते येथील काही युवकांना त्याची भुरळ पाडत आहेत. मात्र, पूर्वी रेकॉर्ड नसलेल्या युवकांशी संबंध वाढवून परप्रांतीय संशयित येथे पाय रोवत आहेत. त्याचा शोध घेण्याचे आव्हान आहे.

परराज्यातील संशयितांनी नवख्यांना सोबत घेऊन केलेल्या गुन्ह्याचा नवा प्रकार आहे. मात्र, परराज्यातील संशयितांचीही माहिती घेण्याचे काम पोलिस दल करत आहेत. पोलिस दलाकडे अद्ययावत यंत्रणेद्वारे माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. परराज्यातील संशयितांचे प्रत्येक पोलिस ठाण्यात हिस्ट्री रेकॉर्ड ठेवण्याचे कामही सुरू केले आहे. 
- विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर

परराज्यातील संशयितांनी स्थानिकांना सोबत घेवून गुन्हा करण्याचा केलेला मोडस अत्यंत गंभीर आहे. तो नवा ट्रेंड रूजू होवू पाहात आहे. मात्र, तो वाढण्यापूर्वीच त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास करत आहोत. 
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com