चोऱ्यांचे सत्र.... पोलिस विभाग सुस्त!

चोऱ्यांचे सत्र.... पोलिस विभाग सुस्त!

कऱ्हाड - आठवडाभरात चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चोऱ्यांत ५० लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या तपासाची पोलिसांकडून हालचाल दिसत नाहीत. चोऱ्यांच्या तपासात पोलिसांना अपयश आलेले दिसते. पोलिसांच्या पट्रोलिंगच्या वेळा व त्यांच्या तपासाच्या हालचाली हेरून चोरटे हातसफाई करत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर या चोऱ्यांच्या तपासाचे आव्हान आहे. 

शहरातील वेगवेगळ्या उपनगरांसह मध्यवस्तीतही चोरट्यांनी केलेल्या चोऱ्यांचा एकही तपास पोलिसांना लावता आलेला नाही. सहा महिन्यांतील चोऱ्यांच्या तपास करतानाच पोलिसांसमोर आठवड्याभरात झालेल्या चोऱ्यांच्या तपासाचे आव्हान आहे. मुंढे येथील सतनाम एजन्सी, मंगळवारातील घर, सैदापुरातील दोन घरे व कृष्णा नाक्‍यावरील ४० तोळ्याच्या दागिन्यांची चोरी... या गुन्ह्यांच्या तपासात पोलिस पिछाडीवरच आहेत. कालच रात्री बुधवारपेठेसह विद्यानगर भागातील तीन फ्लॅट फोडून ३२ तोळे सोने लंपास करण्यात आले. एक झाली की, दुसरी चोरी होतानाचा अनुभव येत असल्याने  पोलिसही चक्रावले आहेत. पहिल्या चोरीचा विचार करून तपासाची दिशा ठरवण्यासही चोर त्यांना संधी देत नाहीत. त्यामुळे चोऱ्यांची शृंखला रोखताना पोलिसांचे कसब लागणार आहे. 

मुंढे येथील ३० लाखांची चोरी, मंगळवार पेठेतील सहा लाखांची चोरी, ओगलेवाडीतील चोरी असो अथवा ३५ तोळ्यांची चोरी असो, त्याच्या तपासासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. चोऱ्यांबाबत पोलिसांनी जनजागृतीचे काम हाती घेतले होते. ‘शेजारीच खरा पहारेकरी’ ही योजना येथे राबवली होती. अलीकडच्या दोन महिन्यांत त्या योजनेकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका म्हणूनही मोठ्या चोऱ्यांकडे पाहावे लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांना आता जागृतीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यातही उपनगरांकडे जादा लक्ष द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. झालेल्या चोऱ्या विशेष करून कॉम्प्लेक्‍समधील आहेत. त्याबाबतही पोलिसांना वेगळा आराखडा हाती घेण्याची गरज आहे. 

‘गुन्हे प्रकटीकरण’चे कामकाज विस्कळित
पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाला मध्यंतरी कोणी वालीच नव्हता, अशी स्थिती होती. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत कांकडकी यांच्यावरील आरोपानंतर त्या पदावर सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी आले. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर काही दिवस त्या विभागाला कोणीच अधिकारी नव्हता. सध्या सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्याकडे सूत्रे आहेत. एकूणच या शाखेच्या कामकाजात विस्कळितपणा दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com