सैदापुरात मगर जेरबंद

सैदापुरात मगर जेरबंद

कऱ्हाड - शहरालगतगच्या सैदापूर येथे खोडशी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मगरी दिसल्याने खळबळ उडाली होती.

त्यातील एक मगर पकडण्यात आली. दुसरी मगर अंधारामुळे गायब झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तासाभराच्या थरारक प्रयत्नानंतर मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी मगर जेरबंद केल्यावर उपस्थित नागरिक, शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

खोडशी बंधाऱ्यावर कामासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीला काल रात्री नऊच्या सुमारास दोन मगरी दिसल्या. त्याने त्याबाबत सैदापूर येथे माहिती दिली. तेथून युवक, शेतकरी बंधाऱ्याच्या दिशेने गेले. त्या वेळी एक मगर रस्त्यावरून जात असल्याचे काहींनी पाहिले. मात्र ती कृष्णा कालव्याच्या विरुद्ध दिशेला उदय दिलीप जाधव यांच्या शेतीच्या दिशेने झुडपात बसली. तिच्यावर नजर ठेवून युवकांनी वनविभागाला माहिती दिली. वनपाल संतोष जाधवर, वनरक्षक सुजित गवते, तानाजी मोहिते, विक्रम निकम, दादाराव बर्गे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झुडपात लपून बसलेल्या मगर पाहून दुसऱ्या मगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे ती सापडू शकली नाही. दरम्यान, मगर पाहण्यासाठी सैदापूरसह विद्यानगर भागातील युवकांनी मोठी गर्दी केली होती. बघ्यांच्या गर्दीमुळे वन कर्मचाऱ्यांना कामात अडथळा येत होता.

मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे हेही काही वेळेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ती पकडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. त्यांच्या सुचनेनुसार वन कर्मचाऱ्यांनी पोती, दोरी, काठ्या आदी साहित्य गोळा करण्यास सुरवात केली. झाडाखाली असलेल्या या मगरीला दोरीचा फास तयार करून पकडण्यासाठी श्री. भाटे व कर्मचारी सरसावले. काठीच्या साहाय्याने मगरीला दोरीच्या फासाने आवळण्याचा केलेला पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. फास तोडून मगर लगतच्या उसाच्या शेताच्या दिशेने गेली. शेताच्या पाटात ती गेल्यावर श्री. भाटे व कर्मचाऱ्यांनी पुन्हा कंबर कसून सापळा रचत दोरीचा फास तयार केला. त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे मगर जेरबंद झाली. त्यावर पोती टाकून तिला पकडून वन विभागाच्या वाहनातून नेण्यात आली. मगरीची लांबी साडेपाच फूट असून, तिचे वजन 55 किलो असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मायक्रोचीप बसवली
वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मगरीला सुरक्षितस्थळी सोडण्यापूर्वी कात्रज येथील राजीव गांधी शासकीय प्राणी संग्रहालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मदतीने मायक्रोचीप बसवण्यात आली. त्यामुळे आता या मगरीवर लक्ष ठेवणे शक्‍य होईल, असे श्री. भाटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com