अतिक्रमण हटाव मोहीम एका दिवसातच थंडावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कऱ्हाड - येथील नगरपालिकेने मोठ्या जोमात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम एका दिवसातच थंडावल्याचे पाहायला मिळते. कृष्णाबाई यात्रा, कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी असल्याचे कारण सांगून या मोहिमेला ब्रेक लागल्याने शहरातील रस्त्यालगत अतिक्रमणे पुन्हा फोफावू लागली आहेत. 

येथील पालिकेपासून बापूजी साळुंखे पुतळा, मुख्य पोस्ट, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा तसेच तेथून कृष्णा नाक्‍यापर्यंत पालिकेने १६ ऑगस्टला अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यात हातगाड्यांसह, टेबल, खुर्च्या व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे हातगाडे व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. मोहीम संपल्यानंतर पुन्हा अतिक्रमणे जैसे थे झाल्याचे पाहायला मिळाली. त्यावरून पालिकेच्या अतिक्रमण पथकाचा व्यापाऱ्यांत असणारा ‘दरारा’ पाहायला मिळाला. यापुढेही अतिक्रमण मोहीम सुरू ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, १७ ऑगस्टला पारशी दिनाची सुटी आल्याने व त्यानंतर अन्य कारणांनी ही मोहीम पूर्णत: थंडावली. कृष्णाबाई यात्रेमुळे मोहिमेला ब्रेक मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात आक्रमक झालेली पालिका थंडावण्यामागे नेमके कारण काय? याबाबत चर्चा  सुरू आहे.