पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - वाळू उपशाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत वाळू व्यावसायिकांनी मारहाण केली. आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच ही घटना घडली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यातील एकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना अहवाल देऊन त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव देणार आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः वाठार येथे दोन गटांत वाळू उपसा सुरू आहे. एक गट सोडून दुसऱ्या गटातून होणारा उपसा बेकायदेशीर आहे, असे शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्या भागाची पाहणी तहसीलदार कार्यालयाने आज केली. त्याची कार्यावाही सुरू होती. त्या वेळी सारेच लोक होते. त्यानंतर सर्व जण येथील तहसीलदार कार्यालयात आले. त्या वेळी ते शेतकरी तेथे आले होते. ग्रामस्थांनी वाठार ग्रामपंचायतीने दहा वर्षांपूर्वीही वाळू उपसा करू नये, असा ठराव केला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वीही तो ठराव केला आहे, अशी माहिती तेथे सांगितली. तहसीलदार कार्यालयाच्या गेटवरच चर्चा सुरू होती. वाळू ठेकेदार त्या लोकांना त्यांच्या गाडीत घालून नेण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी त्यांनी नकार दिला. त्यामुळे आवाज वाढला. त्या वेळी तेथे अन्य ग्रामस्थ आले. मात्र, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला वाळू ठेकेदारांनी थेट मारहाण करण्यास सुरवात केली होती. तेथे धावून गेलेल्या दोघांनाही त्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने पिस्तूल काढून एका शेतकऱ्याच्या कानशीलात लावली. मात्र, तेथे गर्दी जमल्याचे दिसताच त्याने ते पिस्तूल लपवले. गर्दी झाल्याचे लक्षात येताच वाळू व्यावसायिक त्यांच्या मोटारीतून पळून गेले. सहायक पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकातील कर्मचारी दाखल झाले. ग्रामस्थांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्या वेळी तेथे एकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार शेळके यांची भेट घेऊन त्याबाबत माहिती दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार 
तहसीलदार म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे झाले आहेत. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुचवले जाईल, तशी कारवाई होईल. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात झालेल्या प्रकाराचाही अहवाल पोलिसांना देणार आहे.''