मुलींच्या स्वच्छतागृहात अश्‍लील चित्रफित 

मुलींच्या स्वच्छतागृहात अश्‍लील चित्रफित 

कऱ्हाड - येथील आयटीआयमधील (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मुलींच्या स्वच्छतागृहात व शौचालयातील चित्रफित तयार करून ती व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार आज उघडकीस आला. हा प्रकार करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्राचार्य टी. एन. मिसाळ यांनी तडकाफडकी महाविद्यालयातून निलंबित केले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अमित जाधव, दिग्विजय पाटील व संभाजी बिग्रेडचे शहाराध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्राचार्य मिसाळ यांना घेराव घातला. 

येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. तेथे मुले व मुलीही शिक्षण घेतात. मुलीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनासमोर स्वच्छतागृह आहे. तेथेच चित्रीकरणाचा प्रकार झाला. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहात शिरून चित्रीकरण केले. ती चित्रफित व्हॉटस्‌ऍपवर व्हायरल केली. त्याची माहिती समजताच मुलींनी प्राचार्य मिसाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. त्याच दिवशी ज्यांनी चित्रफित केली त्या मुलांनी चालू वर्गात घुसून त्या मुलींना धमकी दिली. त्याचीही कॉलेजने दखल घेतली. त्या प्रकरणात दोषी असलेल्या केदार गायकवाड, ऋषिकेश महाजन, युवराज मोरे व शुभम कानडे यांना त्वरित निलंबित केले, तरीही त्यांचा महाविद्यालय परिसरात वावर होता. यातील एकाचे वसतिगृहात बेकायदा वास्तव्य होते. तोही प्रकार कॉलेज व्यवस्थापनाच्या लक्षात आला. त्यावरही कारवाई करणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. मात्र या प्रकाराची माहिती विद्यार्थी संघटनांसह अन्य संघटनांना समजली. त्यांनी आज प्राचार्यांना घेराव घालून त्याबाबत जाब विचारला. एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने घेराव घातला. त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत प्राचार्यांना जाब विचारला. त्या वेळी या प्रकरणातील चार विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती प्राचार्यांनी दिली, तरीही या प्रकरणात रीतसर गुन्हा दाखल करा. तो दाखल होत नाही, तोपर्यंत प्राचार्यांच्या दालनातून उठणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. तीन तासांपेक्षा जास्त काळ संघटनेचे पदाधिकारी तेथे बसून होते. या प्रकरणाबाबत महाविद्यालयाने भक्कम भूमिका न घेतल्यास आज महाविद्यालय बंद करू देणार नाही. प्राचार्यांसह कोणालाच काम करू देणार नाही, असेही या वेळी संघटनेने जाहीर केले. त्या वेळी प्राचार्य मिसाळ यांच्यासह संघटनेचे काही पदाधिकारी ती तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेले. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कॉलेजमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात झालेल्या प्रकाराची चर्चा तीन दिवसांपासून कॉलेजच्या आवारात सुरू होती. त्यामुळेही त्याची माहिती बाहेर आली. कॉलेजमध्ये ती चित्रफित व्हायरल झाली होती. त्याचीही चर्चा होती. संबंधित मुलांना कॉलेजमधून निलंबित केल्यानंतर ती क्‍लिप अनेकांनी डिलीट केली. 

अधीक्षकाला निलंबित करा 
आयटीआयच्या ज्या चार मुलांनी स्वच्छतागृहात चित्रीकरण केले, त्यातील एक मुलगा अनधिकृतपणे महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता, अशी माहिती प्राचार्य मिसाळ यांनी दिली. त्या वेळी तेथे जमलेल्या संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत त्या वसतिगृह अधीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नका ः पोलिस  
कऱ्हाडच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील प्रकाराबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली. ते म्हणाले, ""मुलींच्या वसतिगृहात कोणीही नसताना काही विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना हा प्रकार समजल्यावर निर्भया पथकासह शहर पोलिसांनी तपासणी सुरू केली. निर्भया पथकाने विद्यार्थ्यांनी तयार केलेली मोबाईल क्‍लिपची खातरजमा केली. या क्‍लिपमध्ये मुलींच्या वसतिगृहाचे आवार... स्वच्छतागृहाचा परिसर दिसत आहे. क्‍लिपमधे वसतिगृहाच्या आवारात कोणतीही मानवी हालचाल दिसत नाही. तिथे कोणीही नसताना हे मोबाईल चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन सोशल मीडियावर काही जण अफवा पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com