‘मराठा क्रांती’साठी वाहन रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कऱ्हाड - मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील मराठा बांधव पुन्हा एकदा एकवटले आहेत. मुंबई मोर्चाबाबत व्यापक जनजागृती व्हावी म्हणून शुक्रवार आणि शनिवारी तालुक्‍यात वाहन रॅलीचे आयोजन करण्याचे काल झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले. रविवारी (ता.३०) दुपारी एक वाजता मलकापूरमधील सोनाई मंगल कार्यालयात मराठा बांधवांची बैठक होईल.

येथील मंगळवार पेठ परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयात काल प्राथमिक बैठक झाली. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासह विविध मांगण्यासाठी पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी मुंबईत मराठा समाज बांधव आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठा समाज बांधवांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी म्हणून शुक्रवारी सकाळी सात वाजता कऱ्हाडमधून तालुकाभर वाहन रॅली काढण्यात येईल. दत्त चौकातून रॅलीला प्रारंभ होऊन ही रॅली कार्वे, वडगाव हवेली, शेणोली स्टेशन, जुळेवाडी, रेठरे कारखाना, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, वाठार, बेलवडे, कालवडे, काले, नांदगाव, ओंड, उंडाळे, तुळसण, कोळेवाडी, तारूख, कुसूर, कोळे, घारेवाडी, किरपे, सुपने, विजयनगर, वारूंजी, पाटण तिकाटणे, तळबीड, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेलीमार्गे ही रॅली कऱ्हाडमध्ये येईल. रॅलीवेळी दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधिस्थळी जाऊन त्यांना अभिवादनही करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता कऱ्हाड शहरासह मलकापूर, सैदापूर, बनवडी, ओगलेवाडी आणि शहरालगतच्या गावांमधून मराठा बांधव रॅली काढणार आहेत. या रॅलीला तालुक्‍यातील मराठा समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहन रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता संपर्क कार्यालयात प्राथमिक बैठक होईल. रविवार (ता.३०) दुपारी एक वाजता तालुक्‍यातील मराठा बांधवांची व्यापक बैठक होईल.