बाबा-काका गटांची सलगी होणार का? 

हेमंत पवार  
मंगळवार, 5 जून 2018

कऱ्हाड - विळ्या-भोपळ्याचे सख्य म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे वारे सध्या वाहत आहेत. चाळीस वर्षांहून अधिक काळ एकमेकांचे तोंडही न पाहणारे नेते सध्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळत असल्याने एकमेकांपासून दूर राहिलेले दोन्ही गट आगामी निवडणुकांच्या निमित्ताने नवी राजकीय बांधणी करणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

शेणोली येथील कार्यक्रमानंतर मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी कसले मनोमिलन म्हणत पत्रकार परिषदेत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, कालच गोटे येथे पुन्हा श्री. चव्हाण,  आमदार आनंदराव पाटील, श्री. उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह पाटील हे एकत्र आल्याने पुन्हा मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे फोटोसेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

एकाच काँग्रेस पक्षात राहूही एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणारे, एकमेकांवर टीका-टिपण्णी करणारे गट म्हणून राज्याला बाबा-काकांच्या गटांची ओळख आहे. एकाच पक्षाची विचारधारा वेगवेगळ्या गटांमार्फत जपण्याचे काम गेली अनेक वर्षे दोन्ही गटांनी केले आहे. अनेक वर्षांच्या राजकीय विरोधाने दोन्ही गट एकमेकांपासून खूपच दुरावले. प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपातूनही दोन्ही गटांतील दरी वाढत गेली. त्यातच गेली ३५ वर्षे उंडाळकर आमदार असतानाही मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांना पक्षाने तिकीट दिले, त्यामुळेही दोन्ही गटांतील रोष वाढला. मात्र, काँग्रेसची राज्यात झालेली स्थिती आणि पक्षाचे विचार काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून हद्दपार होऊ नयेत, यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्‍त होत आहे. त्यातच काल रात्रीच गोटे (ता. कऱ्हाड) येथील कार्यक्रमात श्री. चव्हाण, आमदार पाटील, ॲड. उदयसिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते पुन्हा इफ्तार पार्टीत एकत्र आल्याने जिल्हाभरात त्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. 

मलकापूरचा संदर्भ 
मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर आहे. त्यातच सध्या सत्ताधाऱ्यांचे विरोधक एकत्र झाले आहेत. त्यामुळे तेथील उंडाळकर गटाने कोणाकडे जायचे, असा प्रश्न आहे. मध्यंतरी मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे आणि ॲड. उदयसिंह पाटील यांनी एकत्रित शुभेच्छा दिल्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हापासून मलकापूरात नव्‍या समीकरणाची उत्सुकता आहे. 

Web Title: karad news Prithviraj Chavan congress malkapur