राज्यातील मदरशांसाठी ३.९० कोटी रुपये निधी

सचिन शिंदे
बुधवार, 4 एप्रिल 2018

कऱ्हाड - मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणासह तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पायाभूतसह ग्रंथालय व अन्य शिक्षणाच्या सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी राज्यातील ११० मदरशांसाठी तीन कोटी ९० लाख ८४ हजार ५३८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सहा मदरशांचा त्यात समावेश आहे. तीन जिल्ह्यांसाठी सुमारे १८ लाखांचा निधी मंजूर आहे. सातारा जिल्ह्यातील ५०० तर राज्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. 

नोंदणीकृत मदरशांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार शिफारशी झाल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा मदरशांसाठी १८ लाख २० हजारांचे तर राज्यभरातील ११० मदरशांसाठी सुमारे चार कोटी निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे तो निधी सुपूर्त करण्यात आलेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील ५०० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.  तर राज्यभरात सुमारे ११ हजार विद्यार्थी त्याचे लाभधारक ठरणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील तीन, कोल्हापूरचे एक तर सोलापूरच्या दोन मदरशांना आधुनिकिकरण योजनेचा लाभ होणार आहे. त्यात सहा मदरशांसाठी १८ लाख २० हजारांचा निधी मंजूर आहे. त्यात पायाभूत सुविधांसाठी आठ, शिक्षकांच्या मानधनासाठी दहा लाख तर ग्रंथालयासाठी २० हजारांची तरतूद केली आहे. सातारा जिल्ह्यातील २५४, सोलापुरातील १२२ व कोल्हापुरातील १२१ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील उंब्रज, नागठाणे व मलकापूरच्या मदरशांचा त्यामध्ये समावेश आहे. तिन्ही ठिकाणच्या ग्रंथालयांसाठी १५ हजारांचा निधी आला आहे. नागठाणे येथील मदरशाच्या पायाभूत सुविधेसाठी दोन लाख तर शिक्षकांच्या मानधनासाठी चार लाख पाच हजाराचा निधी आला आहे. उंब्रज येथे एक लाख ४५ हजार तर मलकापूरला एक लाख ८५ हजारांचा निधी शिक्षकांच्या मानधनासाठी आला आहे. 

शासनाने निधी देण्याचा व मदरशांच्या आधुनिकीकरणाचा घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या निर्णयाचा निश्‍चित फायदा होणार आहे. धार्मिक सोबत आधुनिक शिक्षणामुळे मदरशांतील विद्यार्थी सर्वंकष स्पर्धेलाही तोंड देवू शकतात. त्यामुळे हा आधार महत्त्वाचा आहे.
-हाजी मझहर कागदी, अध्यक्ष, मदरसा इस्लामिया जियाऊल कुरआन, मलकापूर 

Web Title: karad news Rs. 3.90 crore fund for madrasa in the state