सहा वर्षांत घटले पाच हजारांवर विद्यार्थी! 

सहा वर्षांत घटले पाच हजारांवर विद्यार्थी! 

कऱ्हाड - आकर्षक कपडे, दारात न्यायला गाडी, अपटुडेटपणा, शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे दिले जाणार शिक्षण याची भुरळ पडून ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांत दाखल केले. त्यातच बदलत्या काळाबरोबर जिल्हा परिषद शाळांतही लोकसहभागातून चांगले बदल करण्यात आले. मात्र, ते पालकांना न रुचल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या सहा वर्षांत कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल पाच हजार 233 विद्यार्थी संख्या घटली असून, ही बाब शिक्षण विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. 

गेल्या काही वर्षांत खासगी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या कपड्यांपासून त्यांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत मोठा बदल  केला आहे. त्यांच्यासाठी वाहनांसह खेळण्याच्या व अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. संबंधित शाळांनी निकालाची परंपराही चांगली राखल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे त्याला भाळून आणि आपल्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करून अनेक पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळेत भरती केले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावोगावी ज्ञानदानासाठी सुरू केलेल्या प्राथमिक शाळांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. तो परिणाम गेल्या चार ते पाच वर्षांपासूनच अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे जागे होऊन शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधी यांनी पालकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर लोकसहभागातुन शाळांचा कायापालट करण्याचीही कार्यवाही सुरू केली आहे. शिक्षकांनी तर घरोघरी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात आवाहन केले. त्यातून उठाव झाल्याने ठिकाणी डिजिटल शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक शाळांत सेमी इंग्रजीही सुरू करण्यात आले आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधाही चांगल्या प्रकारच्या करण्यात आल्या. मात्र, शाळांची पटसंख्या कमी होण्याचे प्रमाणात रोखण्यात यश येत नसल्याचे दिसते. गेल्या सहा वर्षांत तब्बल पाच हजार 233 विद्यार्थी कमी झाले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागासाठी ही विचार करायला लावणारी ही बाब आहे. 

आहार देऊनही पाठ  
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत पोषण आहार दिला जातो. त्यामागे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबाचा विचार करून हा उपक्रम सुरू केला असला, तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी हाही एक त्यापाठीमागे शासनाचा हेतू होता. मात्र, आहार देऊनही विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षण विभागापुढे हा प्रश्नच उभा आहे. 

अशी आहे स्थिती 

वर्ष विद्यार्थी आकडेवारी 
2012-13 27404 
2013-14 26430 
2014-15 25476 
2015-16 24324 
2016-17 23139 
2017-18 22171

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com