कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून घेतला स्वच्छतेचा ध्यास!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - येथील पालिकेने श्रमदानातून स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू होण्यापूर्वी पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली श्रमदान संबंधित मोहीम संपली तरी श्रमदान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे श्रमदानातून स्वच्छ कऱ्हाडचा ध्यास घेतल्याचे दिसून येत आहे. 

कऱ्हाड - येथील पालिकेने श्रमदानातून स्वच्छतेचा ध्यास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू होण्यापूर्वी पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली श्रमदान संबंधित मोहीम संपली तरी श्रमदान सुरूच ठेवले आहे. त्यामुळे श्रमदानातून स्वच्छ कऱ्हाडचा ध्यास घेतल्याचे दिसून येत आहे. 

येथील पालिकेत नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सुरवातीपासूनच स्वच्छतेस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शासनाने १५ सप्टेंबर ते दोन ऑक्‍टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम हाती घेण्यापूर्वीच श्री. डांगे यांनी १३ सप्टेंबर रोजी प्रीतिसंगम बाग व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधी परिसर श्रमदानातून स्वच्छेतस प्रारंभ केला. श्री. डांगे यांनी कर्मचाऱ्यांसह स्वत: श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. दोन दिवस तेथे स्वच्छता झाल्यावर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, हद्दवाढ भागातील गांडूळ खत प्रकल्प परिसर, स्मशानभूमी परिसर, पी. डी. पाटील उद्यान आदी ठिकाणांची श्रमदानातून स्वच्छता केली. गांधी जयंतीदिनी दोन ऑक्‍टोबरला शहरात भाजप, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनीही श्रमदान करून स्वच्छता केली.

त्यानंतर पालिकेसह खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची शहरातून स्वच्छता दिंडी काढण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नेते चव्हाण समाधी परिसरात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यामुळे स्वच्छता हीच सेवा मोहीम संपली असे समजले जात होते. मात्र, श्री. डांगे यांनी आज कार्वे नाका येथील पाण्याचा टाकी परिसर स्वच्छतेचे काम हाती घेतले. तेथील १९६२ मध्ये बांधलेल्या जुन्या टाकीतून मोठ्या प्रमाणात कचऱ्यासह पाण्याच्या व काचेच्या रिकाम्या बाटल्या काढण्यात आल्या. शिवाय परिसरात स्वच्छताही करण्यात आली. त्यामुळे श्री. डांगे यांनी यापुढेही स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. शहर स्वच्छतेचा त्यांनी घेतलेल्या ध्यासास कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यांना यापुढे आवश्‍यकता आहे, ती लोकसहभागाची. त्यातून शहर स्वच्छ ठेवण्यास निश्‍चितपणे मदत होईल, हे नक्की.

‘प्रत्येक आठवड्यातील चार तास श्रमदानातून स्वच्छता मोहीम यापुढे सुरू ठेवणार आहे. त्यामधून शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाईल. या स्वच्छता मोहिमेसाठी शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे.  
- यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका 

Web Title: karad satara news ccleaning campaign