‘महाबीज’चेच बियाणे खरेदीचे फर्मान मागे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

जिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना घेता येणार पसंतीचे बियाणे

जिल्हा परिषदेच्या बैठकीत निर्णय; शेतकऱ्यांना घेता येणार पसंतीचे बियाणे

कऱ्हाड - बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बियाणे उगवलेच नाही अशी तक्रार येऊ नये, यासाठी दक्षता म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अनुदानवरील बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे प्रमाणीत बियाणेच शेतकऱ्यांनी खरेदी करावे, असे सूचित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले त्यांच्या पसंतीचे बियाणे मिळताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींचा विचार कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार आता जिल्हा परिषदेकडून महाबीजचेच बियाणे खरेदी करण्याचे फर्मान मागे घेण्यात आले असून, आता शेतकरी त्यांच्या पसंतीनुसार बियाणे खरेदी करू शकणार आहेत.

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून तरतूद करून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे दर वर्षी उपलब्ध करून दिले जाते. ते बियाणे घेताना दर्जेदार आणि चांगली उगवण क्षमता असलेले असावे, असा निकष कृषी विभागाने घालून दिला आहे. त्यासाठी महाबीजचेच खात्रीशीार बियाणे वापरावे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले होते.

मात्र, शेतकऱ्यांना हवे असलेले महाबीजचे बियाणे सर्वच ठिकाणी उपलब्ध असण्याचा आणि शेतकऱ्यांना हवे ते बियाणे मिळण्यात अडसर निर्माण झाला होता. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा विचार जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. कृषी सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बियाणांसदर्भातील हा विषय चर्चेला आला. त्यामध्ये कृषी समितीच्या सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची काय मागणी आहे त्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार आता शेतकऱ्यांना केवळ महाबीजचेच बियाणे खरेदी करावे लागणार नाही. त्यांना जे हवे ते दर्जेदार बियाणे खरेदी करावे, असे त्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता बियाणे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना ते पावती घेऊन, दर्जेदार असल्याचे आणि उगवण क्षमता चांगली असल्याचे खात्री टॅग लावलेलेच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या अनुदानावरील बियाणे खरेदी करताना ते महाबीजचेच खरेदी करावे, असे ठरवण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि कृषी समितीत झालेल्या निर्णयानुसार आता शेतकरी  महाबीजसह अन्य कोणत्याही प्रकारेच बियाणे खरेदी करू शकतील. अनुदानासाठी त्यांनी बियाणे खरेदी केलेली पावती आणि आवश्‍यक कागद कृषी विभागाकडे सादर करायचे आहेत.
- भूपाल कांबळे, कृषी अधिकारी, कऱ्हाड