डॉल्बीच्या दणदणाटाला पोलिसी दणका!

डॉल्बीच्या दणदणाटाला पोलिसी दणका!

कऱ्हाड - गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करणाऱ्या येथील पोलिसांना मात्र कऱ्हाडच्या मंडळांनी गुंगारा देत नवरात्रोत्सवात तेही विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजविला. गणेशोत्सवात नसला तरी नवरात्रोत्सवात मात्र कऱ्हाडला डॉल्बीचा दणदणाट अनुभवयास मिळाला. शहरातील नागरिकांसह प्रशासनाने डॉल्बी बंदीच्या आवाहनाला हरताळ फासत काही मोजक्‍या मंडळांनी केलेला दणदणाट पोलिस खात्याला आव्हान देणारा ठरला आहे.

राजकीय वरदहस्त असलेल्या काही मोजक्‍या मंडळांनी लावलेला डॉल्बी पोलिस जप्त करून  थेट गुन्हे दाखल करणार का, याकडे लक्ष लागून आहे. 
दसऱ्यानंतर शहरात पौर्णिमेपर्यंत दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुका चालतात.

इतक्‍या दिवस विसर्जनाची परंपरा अलीकडच्या काळात ‘फॅड’ म्हणून रुजल्याचेही दिसून येते. शहरात सुमारे १६९ सार्वजनिक मंडळे दुर्गादेवीच्या मूर्ती बसवतात. त्यात सात मंदिरांत असतात. त्यांचे विसर्जन तेथेच होते. उर्वरित मंडळे कृष्णा नदीत मूर्तीचे विसर्जन करतात. त्यामध्ये दसऱ्याला ५२,  दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (ता. एक) ४२, तिसऱ्या दिवशी (ता. दोन) ४८, चौथ्या दिवशी (ता. चार) वीस, तर पाचव्या दिवशी (ता. पाच) सात मंडळे यंदा त्यांच्या मूर्ती विसर्जित करणार आहेत. काल सुमारे ४८ दुर्गादेवींचे विसर्जन होते. त्यात आझाद चौक परिसरातील न्यू नवजवान व नवकला अशा दोन मंडळांच्या दुर्गादेवींच्या विसर्जन मिरवणुकाही होत्या. दोन्ही मंडळांनी डॉल्बी आणला होता. त्याची पोलिसांना आधीच कल्पना होती. त्यामुळे दुपारपासूनच भोई गल्ली व यादव गल्ली येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

डॉल्बी लावल्यास जप्त करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना व नोटीस पोलिसांनी दोन दिवस आधी व कालही दोन्ही मंडळांना दिलेल्या होत्या. सकाळीही दोन्ही मंडळांना डॉल्बी न लावण्याबाबत बजावण्यात आले होते. मात्र, सायंकाळी न्यू नवजवानचा डॉल्बी दणाणला. त्यांनी दोन बेस व दोन टॉप लावले होते.

त्याबरोबर लाईटची भिंतच उभी केली होती. नवकलाने चार बेस, चार टॉप व लाईट व्यवस्था करून ठेवली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याच परिसरात किरकोळ वाद झाला. अन्‌ पोलिसांना कारवाईची संधी मिळाली. ती पोलिसांनी साधलीही, मात्र त्यामुळे निर्माण झालेला तणाव म्हणजे गावाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. 

वास्तविक गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी’चा नारा देत पोलिसांनी शहरातील मंडळांचे ‘कौन्सिलिंग’ केले. नवरात्रीत मात्र पोलिस जरा गाफील राहिल्याने पोलिसांवर ही वेळ आल्याचे दिसते. गणेशोत्सवात डॉल्बी लावला तर करिअर खराब करून घ्याल, असा सज्जड दम पोलिस अधीक्षकांनी गणेश मंडळांच्या बैठकीत दिला होता. त्यानंतरही पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीपर्यंत त्याच मुद्याला लावून धरले. गणेश आगमनाला आलेले दोन डीजे डॉल्बी त्यावेळी जप्त केले होते. त्याचा वेगळा मेसेज मंडळांमध्ये गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सातत्याने प्रत्येक मंडळाला भेटून डीजे न लावण्याबद्दल हरएक प्रकारे सांगितले होते. विसर्जन मिरवणुकीत डीजे येणार अशी चर्चा झाली तरी पोलिस त्या मंडळांना बोलावून घेत तो न आणण्याबद्दल सांगत होते. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. मात्र, नवरात्रोत्सवात डॉल्बी येणार नाही, अशा पोलिसांच्या आत्मविश्वासाला तडा जाणारी घटना दोन दिवसांत घडल्याचेच दिसते. त्यामागे पोलिसांनी डॉल्बी नकोबाबतचा धरलेला आग्रह कमी झाल्याचेच दिसते. दोन दिवसांपासून काही ठराविक मंडळांनी लावलेल्या डॉल्बीने शहरवासीयांच्याही भुवया ताणल्या गेल्या. राजकीय पार्श्‍वभूमीच्या मंडळांनी केलेल्या धाडसामुळे पोलिस त्या मंडळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी चर्चा असतानाच काल आझाद चौकातील दोन मंडळांना पोलिसांनी दिलेला दणका अधिक चर्चेच ठरला. दुर्गादेवीच्या मिरवणुका मुद्दाम रात्री काढून त्यापुढे डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या मंडळांना एक प्रकराचा धडाच आहे. पोलिसांनी घेतेलेली भूमिकाही यापुढे मंडळांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com