भाजप-‘जनशक्ती’त नक्की कुठे बिनसले?

भाजप-‘जनशक्ती’त नक्की कुठे बिनसले?

कऱ्हाड - वर्षभरापासून नगरपालिकेत एकत्र काम करणाऱ्या सत्ताधारी भाजप व बहुमतातील जनशक्ती आघाडीत दुरावा निर्माण झाला आहे.

दुराव्यामागचे नेमके कारण काय, याची शहरवासीयांना उत्सुकता आहे. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेचा केंद्रबिंदू जनशक्तीच्या नेत्यांचा ‘मी’पणा तसेच त्यांच्यातील ठेकेदार, टेंडर या विषयाभोवती ‘इंटरेस्ट’ असल्याने भाजप- ‘जनशक्ती’च्या वादामागचे नेमके गौडबंगाल काय, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. 

नोव्हेंबर २०१६ ला पालिकेची निवडणूक झाली. कोणत्याही एका पक्ष, आघाडीला सत्ता न मिळता थेट निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली.

त्याशिवाय चार नगरसेवकांच्या रूपाने कऱ्हाड पालिकेत भाजपचे ‘कमळ’ फुलले. जनशक्‍ती आघाडीने सर्वाधिक १६ जागांवर निवडून येत बहुमत मिळवले. लोकशाही आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले.

पालिकेतील राजकीय परिस्थिती दोलायमान झाल्याने अल्पमत-बहुमताचा कारभार होणार? हे स्पष्ट झाले. मात्र, पहिल्यापासून ‘जनशक्ती’ व भाजपचे सूर जुळल्याने वर्षभरात अपवाद वगळता कारभार सुरळीत चालला.

वास्तविक सुरवातीचा काही काळ तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात भाजप-‘जनशक्ती’-‘लोकशाही’ एकत्र आल्याने विकासकामासंदर्भात फारसा वेळ मिळालाच नाही. त्यातही भाजप व ‘जनशक्ती’चे सूर अधिक जुळल्याचे चित्र पाहायला मिळाले. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीनंतर शहराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा असतानाच काही दिवसांपासून भाजप- ‘जनशक्ती’तील धुसफूस वाढली.

स्थायी समितीच्या बैठकीत ‘जनशक्ती’च्या नेत्यांनी नगराध्यक्षांचा अवमान केल्याची घटना घडल्याने त्यास अधिक बळ मिळाले. त्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्यावर पुन्हा दोन्हींचे सूर जुळल्याचे दाखवले जात असताना ता. १५ नोव्हेंबरच्या स्थायी समितीच्या बैठकीकडे ‘जनशक्ती’च्या विषय सभापतींनी पाठ फिरवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्षा, भाजप नगरसेवकांना कल्पना न देता आझाद चौकातील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या घटना भाजपच्या जिव्हारी लागल्याने भाजपने पत्रकार परिषद घेऊन पालिकेत ‘जनशक्ती’शी काडीमोड घेऊन स्वतंत्र कारभार करणार असल्याचे स्पष्ट केले. भाजप व ‘जनशक्ती’तील दुराव्याला कारणीभूत ठरण्यामागे नेमके कारण काय?, याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामध्ये भाजपकडून ‘जनशक्ती’च्या नेत्यांच्या ‘मी’ पणाचा मुद्दा तसेच ‘जनशक्ती’चा टेंडर, ठेकेदारीचा ‘इंटरेस्ट’ या विषयाचा समाचार घेण्यात आला.

रस्त्याच्या कामाच्या निविदेवरून दुरावा?
शासकीय विश्रामगृहातील रस्त्याच्या कामाच्या निविदेवरून ठेकेदारांसमवेत झालेल्या बैठकीने हा दुरावा वाढल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. आजपर्यंत पालिकेच्या कामासंदर्भात कधीही पालिकेबाहेर चर्चा झाली नसल्याचे बोलले जाते. मात्र, प्रथमच काहींनी ‘इंटरेस्ट’ घेऊन केलेल्या या प्रकारामुळे अनेकांचा ‘इगो’ दुखावला गेल्याने ही परिस्थिती ओढावल्याची चर्चा आहे. त्यामुळे या गौडबंगालमागचे कारण उघड होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com