विद्यार्थ्यांच्या वादातून प्रथमेशचा खून

कऱ्हाड - विहेतील युवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या आठ तासांत संशयितांना अटक केली.
कऱ्हाड - विहेतील युवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या आठ तासांत संशयितांना अटक केली.

कऱ्हाड - पार्ले येथे झालेल्या युवकाच्या खुनाचा अवघ्या आठ तासांत तपास करून पोलिसांनी चौघा जणांची नावे निष्पन्न केली आहेत. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी समन्वयातून खुनाचा छडा लावला. त्यातील दोघांना अटक झाली आहे. अन्य दोघे अल्पवयीन आहेत. कॉलेजमधील किरकोळ मारामारीतील खुन्नस संपवण्यासाठी त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

प्रथमेश संजय संकपाळ (वय 18, रा. विहे, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चिन्मय प्रशांत जगताप (19, वडगाव हवेली) व विजय बाळू माने (19, रा. शिरवडे- रेल्वे स्टेशन) यांना अटक झाली आहे.

पोलिस उपअधीक्षक श्री. ढवळे यांनी सांगितले, की चिन्मय जगताप व त्याच्या सोबतचे दोघे येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. चौथा संथयित विजय माने हा वेणूताई चव्हाण महाविद्यालयात शिकतो, तर मृत प्रथमेश हा वेणूताई चव्हाण महाविद्यालयात शिकत होता. चिन्मय व प्रथमेश या दोघांच्या गटात गणेशोत्सवाच्या दरम्यान मारामारी झाली होती. त्यानंतर किमान तीन वेळा दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली होती. चिन्मयच्या गटाचा पहिला खटका उडाला तो तारूख येथील युवकांसोबत. त्यांच्या सोबत प्रथमेश होता. ती मारामामारी केवळ खुन्नस देण्यावरून झाली होती.

त्यानंतर किमान तीन ते चार वेळा दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. शेवटची मारामारी दिवाळीच्या परीक्षा संपण्यापूर्वी झाली होती.

कॉलेजवर चिन्मय जगताप याची दहशत आहे. त्याच्याशी वाद झाल्याने तारूखचा विद्यार्थी कॉलेजला येत नव्हता. तो चिन्मयला घाबरायचा. चिन्मय "डॉन' नाही. तो तुला काही करणार नाही, असे सांगून प्रथमेश त्याला कॉलेजला यायला भाग पाडत होता. ती गोष्ट चिन्मयपर्यंत समजत होती. त्यातून प्रथमेशबद्दलचा द्वेष चिन्मयच्या मनात साठला. तारूखच्या त्या युवकाला मारण्यापेक्षा त्याला चिथवणाऱ्या प्रथमेशचा काटा काढण्याचे प्लनिंग चिन्मयने केले. त्यातूनच प्रथमेशचा खून करण्यात आला.

चिन्मय येथे होस्टेलमध्ये राहात होता. विजय माने शिरवडेहून ये- जा करत होता. खून झालेला प्रथमेश विह्यातून ये-जा करत असे. प्रथमेशचा काटा काढण्यासाठी चिन्मय, विजयसह त्यांच्या सोबतचे दोन अल्पवयीन काही दिवसांपूर्वी चिन्मयच्या होस्टेलच्या खोलीत बसले. तेथे त्यांनी कट रचला. 17 नोव्हेंबरला वेणूताई महाविद्यालयाच्या परीक्षा होत्या. त्या वेळी खून करायचा, असे ठरले. त्यांनी बाजारात जाऊन चाकू, सत्तूर व अन्य हत्यारे आणली. दुपारी अडीच वाजता परीक्षा संपल्यानंतर प्रथमेश बाहेर आला. चिन्मय जगताप, विजय माने व त्याचे दोन साथीदार त्याची वाट पाहात बाहेर थांबले होते. त्यांनी जबरदस्तीने त्याला दुचाकीवर बसवले. पार्ले येथील रानातून रेल्वे स्टेशनकडे नेले.

तेथे दोघांनी प्रथमेशचे हात धरले. दोघांनी त्याच्या मान, पाट व डोक्‍यावर वार केले. ते वार वर्मी लागल्याने प्रथमेश जागीच कोसळला. त्याचा मृतदेह तेथेच टाकून चौघेही पसार झाले. चिन्मय व त्याचा अन्य अल्पवयीन साथीदार पुण्याला गेले. विजय माने व त्याच्या सोबतचा दुसरा अल्पवयीन अन्य गावी गेले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना प्रथमेशचा मृतदेह सापडला. त्याच दिवशी सकाळी प्रथमेशचे आईवडील पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना मुलाचा खून झाल्याची माहिती समजली.

खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत तपासाचा छडा लावला. चिन्मय आणि त्याचे मित्र प्रथमेशला घेऊन गेल्याचे पाहणारे साक्षीदार पोलिसांना मिळाले. तेथून तपासाची साखळी उलगडत गेली. गणेशोत्सवापासून त्यांच्यात झालेल्या मारामारीची सगळी हकीकत संशयितांनी पोलिसांकडे कबूल केली.

चिन्मयसह एक अल्पवयीन विद्यार्थ्यास त्यांच्या वडगाव हवेलीतील घरातून व विजयसह दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यास त्याच्या घरातून पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी लावला आठ तासांत छडा
पोलिस उपअधीक्षक श्री. ढवळे यांच्या पथकाने अवघ्या आठ तासांत खुनाचा छडा लावून संशयितांना गजाआड केल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना 15 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com