तहसीलदारांचा वाळूउपशाकडे कानाडोळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. त्यावर तहसीलदार कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. वाळूच्या अवैध उपशाकडे होणारा कानाडोळा करून त्यांच्या अर्थपूर्ण संबंधांनाच वलयांकित करतो आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काल कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या सभागृहात काल बैठक झाली. त्यानंतर काही लोक सिंघल यांना भेटले. त्यावेळी त्यांनी अवैध वाळू उपशाची चौकशी करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे सांगितले. 

तालुक्‍याच्या उत्तर-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. तासवडे, शिरवडेसह विविध भागांत राजकीय हस्तक्षेपाने तो उपसा सुरू आहे. तासवडे येथे मोठा प्लॅन्ट उभा आहे. तेथे मातीमिश्रित वाळूचा उपसा जोरात चालतो. तेथे काही राजकीय लोकांच्या वरदहस्ताने चालणाऱ्या उपशावर कारवाई करण्यासाठी अधिकारीही घाबरत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत तहसीदारांकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत. मात्र, त्यावर काहीही कारवाई केली जात नाही.  

तालुक्‍याच्या दक्षिण भागातही मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू आहे. त्या भागातून भरदिवसा होणाऱ्या उपशाची माहिती तहसीलदार कार्यालयास आहे. मात्र, त्यावरही कारवाई होताना दिसत नाही. तांबवेच्या पुलाखालून मध्यंतरी कोयना नदीतून मोठ्या प्रमाणात उपसा होत होता. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा तहसीलदार कार्यालयाने उगारला. मात्र, अन्य ठिकाणी त्या पद्धतीची कारवाई का केली जात नाही, असा नागरिकांचा प्रश्‍न आहे. शिरवडेच्या भागातही होणाऱ्या वाळू उपाशाला पाठीशी घातले जात आहे. गोवारेच्या भागातूनही मध्यंतरी मोठ्या प्रमाणात वाळूउपसा झाला. जिल्हाधिकारी सिंघल यांच्या कालच्या दौऱ्यात त्या गोष्टी उघड झाल्या. माध्यमांनीही ही बाब त्यांच्या नजरेस आणून दिली. त्यामुळे त्यांनी अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आता तहसीलदार कार्यालय काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून आहे.