करगणीकर, माळी यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

‘सकाळ‘च्या बातमीदारांवरील हल्लाप्रकरणी 24 तासांतच कारवाई
जत - ‘सकाळ‘चे माडग्याळ (ता. जत) येथील बातमीदार दत्ता सावंत यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी चारा छावणी ठेकेदार व शिवसेनेचा तालुकाप्रमुख प्रदीप भीमराव करगणीकर (वय 37) व त्याचा साथीदार ग्रामपंचायत सदस्य अशोक बसाप्पा माळी (वय 48) यांना उमदी पोलिसांनी 24 तासांतच अटक केली. दोघेही गुड्‌डापूर (ता. जत) येथे लपून बसले होते. त्यांना उद्या (ता. 9) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

माडग्याळ येथील दूध संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या चारा छावणीतील निकृष्ट चाऱ्यामुळे 13 जनावरांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण श्री. सावंत यांनी उघडकीस आणले होते. त्याबाबतच्या बातम्या "सकाळ‘मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. गेल्या सहा दिवसांपासून गरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी हा विषय लावून धरला होता. "चारा छावणीची बातमी का प्रसिद्ध केलीस?‘ असा जाब विचारून काल (गुरुवारी) सावंत यांच्यावर करगणीकर व माळी यांनी हल्ला केला. सावंत जखमी होऊन बेशुद्ध पडले. दोघांनी सावंत यांची पत्नी निर्मला यांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. जखमी सावंत यांनी फिर्याद दिल्यानंतर उमदी पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पत्रकारावर हल्ला झाल्याने जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला. प्रत्येक तालुका संघटनेने तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. तसेच पत्रकार संघटना, वृत्तवाहिनी पत्रकार संघटना, ग्रामीण पत्रकार संघटनाचे पदाधिकारी व सदस्य यांनी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.