कास रस्त्यावर बांधकाम सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सातारा - वर्षभरापूर्वी कास रस्त्यावरील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालविण्याची जिल्हा प्रशासनाची वल्गना हवेतच विरून गेली आहे. उलट इशारा नोटिसांचे नाचलेले घोडे व पंचनाम्यांचा शो झाल्यानंतर कास रस्त्याला धनदांडग्यांनी दुप्पट वेगाने बांधकामे सुरू केली. बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्याने कास परिक्षेत्रात बांधकामांस बंदी असल्याचे सांगणारा सरकारी फलक हास्यास्पद ठरला आहे. 

सातारा- कास रस्त्यावर गेल्या १५ ते २० वर्षांत अमर्याद बांधकामे झाली. आजही ती सुरू आहेत. लोकांनी कुंपने घालून ठेवली. ही कुंपणं आणि बांधकामांमुळे कासच्या निसर्गसौंदर्याला बाधा पोचत आहे. जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा त्यामुळे धोक्‍यात आला आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री विजय शिवथरे यांनी कास रस्त्यावरील सर्व बांधकामांची तपासणी करून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

बेकायदा बांधकामे पाडून टाकण्याच्या त्यांच्या स्पष्ट सूचना होत्या. कास परिक्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी नसल्याचे फलक या रस्त्यावर लोकांना सहज दिसतील अशा ठिकाणी लावण्याच्या पालकमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना होत्या. त्याप्रमाणे अंमलबजावणी ही झाली. तहसीलदारांच्या आदेशाचे फलक कास रस्त्याला दोन ठिकाणी झळकले. मात्र पालकमंत्र्यांचे आदेश फलक लावण्याच्या अंमलबजावणीपूर्तेच मर्यादित राहिल्याचे येथे चित्र आहे. 

एक वर्षापूर्वी प्रशासनाने कास रस्त्यावरील बांधकामांवर कारवाईचा बडगा उगरला होता. पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने शासन कधी नव्हे ते काहीतरी करत आहे, असे आशादायी चित्र निर्माण झाले होते; परंतु प्रशासकीय कार्यवाही सुरू झाल्यानंतर दुप्पट वेगाने अर्धवट बांधकामे पूर्ण करून घेण्यात आली. आता जागोजागी नव्याने बांधकामे सुरू असल्याचे दिसते.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
‘युनोस्को’च्या गटाने काही महिन्यांपूर्वी कास पठाराला भेट दिली. त्या वेळी सदस्यांनी कास रस्त्यावरील वाढत्या बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘युनोस्को’चा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा टिकावण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होत असताना या रस्त्याला होत असलेल्या अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठीची महसूल यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पालकमंत्र्यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून तो तडीस न्यावा, अशी अपेक्षा सजग नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: kas road work