सातारा जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत ३७ टक्के पीक कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

६०३ कोटींचे वाटप; जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर 
काशीळ - जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक हजार ६५० कोटी १५ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ३० जूनपर्यंत ६०३ कोटी पाच लाख रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या ३७ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वाधिक ४६७ कोटी ९८ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. 

खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत असून, त्याकरिता अडीच महिने उरले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा बॅंक, त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी जोडलेले आहेत. पीक कर्जवाटपात जिल्हा बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेस या हंगामात ८१० कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ४६७ कोटी ९८ लाख रुपयांचे वाटप केले असून, ५८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १४१ कोटी ४२ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ३७ कोटी ६१ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या २७ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाला १५९ कोटी ९० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २६ कोटी ७५ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या १७ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. बॅंक ऑफ इंडियाने १४२ कोटी १४ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी १४ कोटी ४९ लाख रुपये म्हणजेच दहा टक्के वाटप केले आहे. 

खासगी बॅंका उदासीन 
जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. मात्र, ॲक्‍सिस, फेडरल, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक आदी खासगी बॅंकांकडून तुलनेत कमी कर्जपुरवठा करण्यात आला आहे. १७३ कोटी ३० लाख रुपये कर्जवाटपाचे या बॅंकाना उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३५ कोटी ३२ लाख रुपयांचे म्हणजेच २० टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपाची सप्टेंबरअखेर मुदत असून, या वाटपाची गती पाहता उद्दिष्टे गाठणे शक्‍य होणार नसल्याचे दिसून येत आहे.