आडसाली ऊसक्षेत्रामध्ये घट

आडसाली ऊसक्षेत्रामध्ये घट

काशीळ - जिल्ह्यात आडसाली उसाची २३ हजार ३६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार ७८८ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. मात्र, माण, खटाव या दुष्काळी तालुक्‍यांत आडसाली ऊस लागवडीकडे कल वाढला. 

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता कऱ्हाड, फलटण, सातारा, वाई, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण, पाटण, जावळी या सर्व तालुक्‍यांत कमी अधिक प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. जास्त उत्पादन, लवकर ऊस तुटेल, तसेच रब्बी हंगामात आंतरपिके घेता येत असल्याने आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला होता. मात्र, या हंगामात शेतकऱ्यांकडून आडसाली ऊस करण्याचा कल कमी झाल्याचा दिसून येत आहे.

आडसाली लागवडीच्या काळात दमदार झालेला पाऊस, काही कारखान्यांकडून बियाण्यांसंदर्भात बदलेली धोरणे, तसेच या हंगामात जाणवू लागलेली मजूरटंचाईमुळे आडसाली ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे.  दरम्यान, जिल्ह्यात गत हंगामात २५ हजार ८२४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे, तर या हंगामात २३ हजार ३६ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. या तुलनेत दोन हजार ७८८ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. सर्वाधिक सात हजार ७३८ हेक्‍टर ऊस लागवड कऱ्हाड तालुक्‍यात झाली आहे. पूर्व हंगामी, सुरू हंगामात ऊस लागवड किती क्षेत्रावर होईल, तसेच खोडवा ऊस किती क्षेत्रावर ठेवला जाईल, यावर पुढील गळीत हंगामाचे भवितव्य ठरणार आहे.

फलटण तालुक्‍याच्या पूर्व भाग बागायती असल्यामुळे या तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, माण, खटाव या दोन प्रमुख दुष्काळी तालुक्‍यांमध्ये पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या दोन तालुक्‍यांत ७८१ हेक्‍टर क्षेत्रावर निव्वळ आडसाली उसाची लागवड आहे. पूर्व हंगामी व सुरू हंगामात उसाची लागवड होणार असल्याने या तालुक्‍यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

तालुकानिहाय आडसाली ऊस लागवड (हेक्‍टरमध्ये) 
सातारा - ७,७३८, कोरेगाव- १५७६, खटाव- ६४४, कऱ्हाड- ६५४६, पाटण- ७५६, वाई- ९०१, जावळी- १२३, खंडाळा- ८१०, फलटण- ३८०५, माण- १३७.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com