सव्वाशे वर्षे चव टिकवलेला चिवडा- लाडू

सव्वाशे वर्षे चव टिकवलेला चिवडा- लाडू

कोल्हापूर- बाहेरचं खाणं तर सोडाच; पण हॉटेलात जाणंही वर्ज्य मानलं जात होतं अशा काळात कोल्हापुरात चक्क महाद्वार रोडवर चिवडा-लाडूचं दुकान सुरू झालं. आज त्याला तब्बल 124 वर्षे झाली. हे दुकान ज्याला काही लोक कोल्हापुरातलं पहिल्या तीनपैकी एक हॉटेल असेही म्हणतात ते उद्या 125 व्या वर्षाची वाटचाल सुरू करणार आहे. खवय्यांना दीपावली संपल्यावरही चिवडा-लाडू खायला घालत 125 वर्षे हे दुकान आहे त्याच ठिकाणी आपला जुना बाज टिकवत उभे आहे. हे दुकान म्हणजे कोल्हापूर शहराचा केंद्रबिंदू असलेल्या महाद्वार रोडच्या सव्वाशे वर्षांच्या सलग वाटचालीचा साक्षीदार ठरले आहे.

कोल्हापुरी संगीत चिवडा असं वेगळ्या सुरावटीचंच नाव या दुकानाला आहे.
महाद्वार रोडवर महाद्वार चौकालगतच चिपडे यांच्या इमारतीत हे दुकान आहे. वेंगुर्ला येथील गोविंद विनायक मराठे हे काहीतरी व्यवसाय करायच्या निमित्ताने कोल्हापुरात आले. त्या वेळी महाद्वार रोड आजच्यासारखा मोठा नव्हता. कोल्हापुरात लाईटही नव्हती. महाद्वार रोडवर दोन्ही बाजूला जोशीराव, चिपडे, कडेकर, नागपूरकर, नारळीकर, सूर्यवंशी, काशीकर, शुक्‍ला, पंचांगकर्ते लाटकर, वैद्य दुधगावकर, वैद्य उमराणीकर, नागावकर, मोघे, हसबनीस, दगडू बाळा भोसले, पंडितराव, चावरेकर भोसले यांचे वाडे होते. त्यापैकी चिपडे यांच्या वाड्यात चिवडा-लाडूचे हे दुकान सुरू झाले. अर्थात त्या वेळच्या स्थितीनुसार ""ब्राह्मणाचे फराळाचे दुकान'' म्हणूनही ते ओळखले जाऊ लागले.

येथे मिळणाऱ्या चिवड्याला संगीत चिवडा का म्हणतात याबद्दल कुतूहल आहे; पण कोल्हापुरातील तत्कालीन नाट्य, संगीतातील दिग्गजांचे हे आवडते दुकान व त्यांनी संगीत चिवडा असे त्याचे नामकरण केले व ब्राह्मणाचे हे फराळाचे दुकान कोल्हापुरी संगीत चिवडा म्हणून रूढ झाले.
काजू, मणुके, बेदाणे असलेला येथील चिवडा 125 वर्षे जशीच्या तशी चव टिकवून आहे. जोडीला बुंदीचे लाडू, डिंकाचे लाडू, नाचणीचे लाडू, गुलकंद बर्फी आहे.

या दुकानाचे वैशिष्ट्य असे की 125 वर्षे ते एकाच जागी आहे. दुकान म्हणजे महाद्वार रोडच्या स्थित्यंतराचा साक्षीदार आहे. इथल्या शुक्‍लांच्या वाड्यात कात्यायणीच्या डोंगरातून पाटाने कसे पाणी आणले, हे मराठे यांच्या एका पिढीने पाहिले आहे. महाद्वार रोडवर आज 24 तास वर्दळ आहे; पण शुक्रवार, मंगळवार हा महालक्ष्मी देवीचा वार सोडला तर महाद्वार रोडवर एरवी कायम कशी सामसूम होती, हे या दुकानाने अनुभवले आहे. पळसाच्या पानाचा द्रोणसारखा वापर डिश म्हणून होत होता. उधारीवर चिवडा, लाडू नेणाऱ्या ग्राहकांनी वेळेत उधारी भागवली नाही तर उधार खरेदीवर ग्राहक म्हणून एक फळा दुकानासमोर लावला जात होता. त्यावर त्या ग्राहकांची नावे लिहिली जात होती. त्यामुळे कोल्हापुरी संगीत चिवडाची उधारी बुडवण्याची कोणाची हिंमत नव्हती.

आज मराठे यांची चौथी पिढी हे दुकान चालवते. फार जाहिरात नाही, गाजावाजा नाही; पण फक्त जिभेवरील चव या निकषावर संगीत चिवडा, लाडू दुकान सुरू आहे. उद्या सायंकाळी चार वाजता या निमित्ताने एक घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे. इथला चिवडा लाडू घ्या अथवा घेऊ नका; पण एक व्यवसाय केवळ चव टिकवून 125 वर्षे कसा टिकू शकतो हे पहायला यावं, अशी मराठे परिवाराची अपेक्षा आहे.

1880 ला पहिले हॉटेल
125 वर्षांच्या या लाडू-चिवड्याच्या निमित्ताने कोल्हापुरातले पहिले हॉटेल (उपाहारगृह) कोणते याला ज्येष्ठ व्यक्तींकडून उजाळा मिळाला. 1880 च्या दरम्यान महाद्वार रोडवर गाडवे यांच्या इमारतीशेजारी एक उपाहारगृह सुरू झाले. त्यानंतर दातार बिल्डिंगमध्ये (आताचे देशपांडे वॉचमेकर) कारापूरकर यांनी हॉटेल सुरू केले. त्यानंतर वाईकर, पडळकर, समर्थ, चव्हाण यांची हॉटेल सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com