महापालिकेत घोडेबाजारावरून चिखलफेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - घोडेबाजार हेच ताराराणी आघाडीचे मुख्य हत्यार असल्याने स्थायी समिती सभापतीच्या निवडीत पुन्हा ताराराणी आघाडीने हे गंजलेले हत्यार बाहेर काढले. काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ताराराणीने सौदेबाजी केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे रिना कांबळे यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे प्रा. पाटील, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

प्रा. पाटील म्हणाले, ‘‘रिना कांबळे या एका गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन निवडून आणले. यामध्ये आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, विजय देसाई यांनी प्रयत्न करून निवडून आणले; पण रिना कांबळे या नाराज होत्या. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबीयांशीही बोललो; पण यातून मार्ग निघाला नाही. स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून त्या गायब होत्या. आम्ही माहिती घेतली असता त्या ताराराणी आघाडी व भाजपच्या गोटात जाऊन बसल्याचे समजले. त्यामुळे आम्ही त्यांना व्हिप बजावला.

रजिस्टर एडी केले, त्यांना व्हिप लागू केला आहे. आज त्या मतदानासाठी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पक्षाचा आदेश डावलला आहे. त्यांच्यावर कारवाई निश्‍चित आहे. २००५ ला घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होता. महाडिकांचे चुकीचे राजकारण मोडायचे म्हणून मुश्रीफ, विनय कोरे यांच्या साथीने त्यावेळी जशास तसे राजकारण केले. पण नंतर एका टप्प्यावर महाडिक, सतेज पाटील, कोरे, मुश्रीफ यांच्यासह सर्व नेते एकत्र आले व घोडेबाजार थांबवायचा निर्णय झाला. तो शब्द गतवर्षीपर्यंत सर्वांनी पाळला. पण या वेळी ताराराणी आघाडीने त्यांचे गंजलेले हे हत्यार पुन्हा बाहेर काढले. त्यांनी मतदानासाठी व बहुमतासाठी रिना कांबळेंची सौदेबाजी केली. या पत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेते प्रवीण केसरकर, मुरलीधर जाधव, प्रताप जाधव, आदिल फरास, सचिन चव्हाण उपस्थित होते.

आम्ही होतो म्हणून महाडिक खासदार 
आम्ही सगळे पाठीशी होतो म्हणून धनंजय महाडिक हे खासदार झाले. आम्ही नसतो तर महाडिक खासदार झाले नसते. पण त्यांनी भाजपला मदत केली आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी सांगावे. खासदार या पदाचा मान राखून त्यांनी विकासाचे राजकारण करावे. अशा प्रकारच्या सौदेबाजीला त्यांनी थारा देऊ नये, असे मत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच या निवडणुकीत मदत करणाऱ्या शिवसेनेचे त्यांनी आभार मानले. भाजपला विरोध म्हणून शिवसेनेने मदत केली, त्यासाठी आम्हाला कोणतेही हत्यार वापरावे लागले नाही, असा खुलासा प्रा. पाटील यांनी केला.

Web Title: kmc politics