समीरने नेमके काय केले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कोल्हापूर - फरारी असलेला विनय पोवार आणि सारंग आकोळकरने गोळ्या झाडल्याचे उमा पानसरेंनी जबाबात सांगितले असेल तर समीरने काय केले? त्याचा काहीच संबंध नसेल तर त्याला व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्कानुसार सशर्त जामीन मंजूर करावा, अशी मागणी आज समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात केली. सरकारची बाजू मांडल्यानंतर समीरला जामीन मंजूर करावा की नको याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नरेंद्र दाभोळकर हत्येतील पिस्तूल गोविंद पानसरे हत्येत वापरली असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. दाभोलकरांच्या हत्येतील पिस्तूल पुणे पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर ते सीबीआयला दिली होते. असे असताना पोलिसांकडील पिस्तूल आरोपीपर्यंत कसे पोचले याचाही तपास व्हावा, अशीही मागणी त्यांनी न्यायालयात केली.

जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या समोर सुमारे पटवर्धन यांनी बाजू मांडली. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे 16 जूनला सकाळी अकरा वाजता सरकारची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर समीरच्या जामीन अर्जावर निर्णय होईल. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील पहिला आरोपी म्हणून "सनातन' संस्थेचा साधक समीर गायकवाडला पोलिसांनी अटक केली. सध्या तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात आहे.

पटवर्धन यांनी समीर गायकवाडला जामीन मिळावा यासाठी तिसऱ्यांदा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली.