पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची भाजप आघाडीची ग्वाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - तुमचा हक्क... चांगलं जीवन जगण्याचा, तो आम्ही देऊ. शिकणाऱ्याला संधी, नव उद्योग निर्माण, गावगावात लघुउद्योग, आणि कौशल्य विकासातून जगण्याचे नवे मार्ग निर्माण करण्याचे आश्‍वासन भाजप, रिपाइं, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडी पक्षाच्या वतीने जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यावरही भर दिला आहे. 

कोल्हापूर - तुमचा हक्क... चांगलं जीवन जगण्याचा, तो आम्ही देऊ. शिकणाऱ्याला संधी, नव उद्योग निर्माण, गावगावात लघुउद्योग, आणि कौशल्य विकासातून जगण्याचे नवे मार्ग निर्माण करण्याचे आश्‍वासन भाजप, रिपाइं, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडी पक्षाच्या वतीने जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यावरही भर दिला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त कोरोची (ता. हातकणंगले) येथे काल या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार विनय कोरे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, उद्योजक सुरेश पाटील, अशोक स्वामी, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. 

जाहीरनाम्यात दिलेले आश्‍वासने अशी  
- गावात नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकासाचे नियोजन (डी.पी. प्लॅन) तयार करून नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. 
- जिल्ह्यातील सर्व गावे / गाव वस्त्या पक्‍क्‍या रस्त्याने जोडून विकसित करणार, पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करून पक्के बनविणार व रस्त्यांचा चेहरामोहरा बदलून टाकणार! मोठे रस्ते, सुविधा पूल, साकव, दळणवळण यातून गावागावांत संपर्क वाढविणार. 
- राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे योजना याद्वारे पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवून पुढील 25 वर्षांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणार. 
- सात-बारा तर आता ऑनलाईन झाला! महसूल विभाग, पणन विभाग, ग्रामविकास योजना यांच्या एकसूत्री अंमलबजावणीतून शेतकऱ्याला कागदपत्रे सहज मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा. 
- रोजगार निर्मितीसाठी स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन उद्योग क्षेत्रात संधी देणार. जिल्ह्यातील प्रत्येक गावात माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारून केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षा व शेतकरी यांना आवश्‍यक माहिती उपलब्ध करणार. 
- शेतजमिनीवर पाणंद रस्ते सुधारणा करणार, तसेच कृषी अवजारांचे वाटप. 
- शेतकऱ्यांसाठी आम्ही देऊ शाश्‍वत संधी विकासाची. मागेल त्याला शेततळे, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, पाटबंधारे प्रकल्प यासारख्या योजनांतून शेतकरी बांधवांना बळकट करण्याचा नियोजनबद्ध विकास कार्यक्रम राबविणार. 
- केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना प्रत्येक मतदारसंघात प्रभावीपणे राबविणार. शेतकरी महिला, युवक, यांना लाभ मिळवून देणार. समृद्धी, सुरक्षा, सुशासन, नियोजन, पारदर्शी; कारभार, व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाद्वारे गावे स्मार्ट करून देशात आदर्श निर्माण करणार. 
- जिल्हा परिषद शाळा सक्षम करून ई-लर्निग, कौशल्य विकास, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन पटसंख्या वाढविणार. 
- ग्रामीण भागातील पात्र व गरजू लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यात सहकार्य करणार. 
- पंचगंगा प्रदूषण रोखण्याकरिता गावांना शासनामार्फत निधी उपलब्ध करून देणार. 
- जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांसाठी अतिथीगृह बांधणार. 
- जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती जिल्हा परिषद मुख्य कार्यालयाला संगणकाद्वारे जोडणार. तसेच ग्रामपंचायत पातळीवर आपले सरकार व केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार. 
- सामाजिक न्याय विभाग अंतर्गत उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या नव्या योजना सुरू करणार. 

Web Title: kolhapur bjp manifesto