कोल्हापूरच्या उद्योजकांनी आता ग्लोबल व्हावे - धनंजय महाडिक

कोल्हापूरच्या उद्योजकांनी आता ग्लोबल व्हावे - धनंजय महाडिक

कोल्हापूर - कोल्हापुरातील उद्योजकांमध्ये कार्यक्षमता आहे; पण या क्षमतेला त्यांनी मर्यादा घालून घेतली आहे. याच क्षमतेच्या जोरावर त्यांनी विकासासाठी देशाची सीमा ओलांडली पाहिजे, कोल्हापुरातील उद्योजकांना आता मात्र ग्लोबल झाल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केले. सयाजी हॉटेलमध्ये "एसएमई मॅन्युफॅक्‍चर्स अँड एक्‍स्पोर्टस्‌ समिट' परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल ऍन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियातर्फे झालेल्या परिषदेसाठी घोडावत एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत, बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंजमधील एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर, एमएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'कोल्हापुरात चांगला उद्योग आणि उद्योजक आहेत. कौशल्यपूर्ण उद्योग ही कोल्हापूरची खासियत आहे. दर्जेदार उत्पादन निर्मितीची क्षमता असणाऱ्या कोल्हापुरातील उद्योजकांना आता मात्र ग्लोबल झाल्याशिवाय पर्याय नाही. देश-विदेशात अनेक संधी उपलब्ध आहेत; पण या संधी साधण्याच्यादृष्टीने उद्योजकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही उद्योगाची प्रगती झाली पाहिजे, यासाठी एसएमईची मदत घेतली पाहिजे. उद्योजकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांबाबत माहिती दिल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू.''

श्रेणिक घोडावत म्हणाले, 'सध्या विविध उत्पादने बाजारात येत आहेत. एकच कंपनी दहा उत्पादने बाजारात आणते. त्याऐवजी एक उत्पादन दहा बाजारपेठांमध्ये कसे पोचेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या व्यवसायाचा किमान पाच वर्षांचा आराखडा डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी. स्वत:चा ब्रॅंड विकसित करताना संबंधित देश लक्षात घ्यावा.''

अध्यक्ष साळुंखे म्हणाले, 'स्टार्ट अप व स्टॅंड अप इंडियाच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना मदतीचा हात दिला जाईल. तरुणांनी उद्योगाकडे सकारात्मकरीत्या प्रयत्न केले पाहिजेत. जगातील देशांशी आयात-निर्यातीच्या सुविधा, मार्गदर्शन एसएमईद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.''

या वेळी एसएमईचे संचालक महेश साळुंखे आदींसह कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर परिसरातील उद्योजक उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंजमधील एसएमईचे प्रमुख ठाकूर, स्टेट बॅंक ऑफ इंडियामधील एसमएईचे जी. एस. राणा, एसआयडीबीआयच्या कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक भगवान चंदाणी, ईसीजीसी लिमिटेडचे अफसाना शेख, पुण्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सचिन तिजारे यांनी मार्गदर्शन केले.

शेती उत्पादनाला चांगली मागणी
कोल्हापुरातील शेती व औद्योगिक क्षेत्राला विदेशातही मागणी आहे. या सर्वांची संख्यात्मकदृष्टी असलेली मागणी पूर्ण करणे येथील उद्योजकांना शक्‍य नाही. याशिवाय शेतकऱ्यांनी सामूहिक शेती अथवा शेती करणाऱ्यांनी एकत्रित यावे. यामुळे परदेशातील मागणीनुसार आपल्याला पुरवठा करण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com