कोल्हापूर शहरातील रस्ते खड्ड्यात !

kolhapur city road into the ditch
kolhapur city road into the ditch

कोल्हापूर - शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून "चलती का नाम गाडी' असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार काय ? महापालिकेत अन्य विषयांवर आवाज उठविणारे नगरसेवक नागरिकांसाठी, वाहनधारकांसाठी रस्ते दुरुस्ती, नूतनीकरणासाठी प्रयत्न करणार काय ?

शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर, बाबूभाई परीख पूल, बागल चौक ते शाहूमिल रस्ता, टेंबे रोड, बिंदू चौक ते उमा टॉकीज, असेंम्बली रोड, मंगळवार पेठेतील तुरबती जवळचे रस्ते म्हणजे वाहनधारकांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हणजे "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते' अशी स्थिती आहे.

दुर्गंधी आणि खड्ड्यांनीच स्वागत
मध्यवर्ती बस स्थानक म्हणजे कोल्हापूर शहराचे नाक समजले जाते. तेथे येणाऱ्या प्रवाशांचे स्वागतच खड्डे आणि दुर्गंधीने होते. परगावाच्या प्रवाशांना कोल्हापूरची ओळख म्हणजे खड्डेपूर अशीच होते. त्यातच होणारी दुर्गंधी म्हणजे नाक धरूनच पुढे जावे लागते. येथील खड्डे रस्ता सुरू झाल्यापासून ते पुढे बाबूभाई परीख पुलापर्यंत आहेत. या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण गरजेचे आहे.

कायमच खड्ड्यात
प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून आणि हिवाळा-उन्हाळ्यात खड्ड्यांमुळे चर्चेत असलेल्या बाबूभाई परीख पूल परिसरातील कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. येथील रस्त्यांवर डांबर पडले की नाही, अशीच स्थिती आज येथे दिसून येत आहे. वळण घेताना मोटारचालकांना खड्डे चुकविण्याचाही अंदाज येत नाही, इतकी खराब स्थिती तेथे आजही आहे. गतवर्षीच येथे डागडुजी केली होती. मात्र, ती एकाच पावसाळ्यात निघून गेली. आता कायमस्वरूपीच उपाययोजना करावी, पाण्याचा निचरा योग्य होईल, दर्जेदार डांबरीकरण होईल, यासाठी विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे.

शाहू मिलकडे खड्ड्यातूनच जायचे
जयराज पेट्रोल पंपापासून शाहू मिलकडे जाताना रस्त्यावरून जातो की खड्ड्यांच्या अडथळ्यांतून हेच कळत नाही. मुख्य रस्त्यावरील अनेक वाहने शाहू मिलकडे पर्यायाने राजारामपुरीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. येथे सकाळी आठपासून रात्री दहापर्यंत नेहमी गर्दी असते. हा रस्ताही तातडीने नवीन करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

टेंबे रोड म्हणजे खड्डेच खड्डे...
एकेरी मार्गापैकी एक असलेला आणि उद्यमनगर ते खासबाग जोडणारा रस्ता म्हणून टेंबेरोड महत्त्वाचा आहे. उमा टॉकीजकडून खासबागकडे जाण्यासाठी याच एकेरी टेंबेरोडचा उपयोग करावा लागतो. तेथे पर्यायी रस्ताच नाही. गणेशोत्सवात हा रस्ता दुरुस्त होणे अपेक्षित होते. तरीही तेथे केवळ मुरुमानेच डागडुजी झाली. आता तर खड्डेच खड्डे, अशी या रस्त्याची नवी ओळख बनली आहे. याकडे कोण लक्ष देणार आहे काय ?

मंगळवार पेठेतील तुरबतीजवळही खड्डेच...
उपनगरातून मंगळवार पेठेतील तुरबतीजवळूनच पुढे महालक्ष्मी मंदिराकडे जावे लागते. उपनगरातील बहुतांशी विद्यार्थी सायकलवरून या रस्त्याने महालक्ष्मी मंदिर परिसरातील शाळांमध्ये जातात. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांतून पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि वाहनधारकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. अरुंद असलेल्या या रस्त्याची किमान डागडुजी तातडीने होणे अपेक्षित आहे.

बिंदू चौक ते कॉमर्स कॉलेज
शहराचा मध्यवर्ती आणि वर्दळीचा भाग म्हणूनो बिंदू चौक मानला जातो. बिंदू चौक ते कॉमर्स कॉलेज हा एकेरी रस्ता आहे. खासबाग, दसरा चौकाकडून येणारी वाहतूक उमा टॉकीजकडे याच मार्गावरून जाते. विशेष म्हणजे याच परिसरात पर्यटकांसाठी असलेली पार्किंग व्यवस्था आहे. येथेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे कोल्हापूरच्या नावाची पर्यटकांतून बदनामी होते. हजारो वाहनधारकांसाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त केला पाहिजे.

उपनगरातही वाईट अवस्था
शहरातील काही रस्त्यांची ही दुरवस्था असली तरीही उपनगरासह इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. पावसाळ्याच्या नावाखाली गेली तीन-चार महिने नागरिकांनी, वाहनधारकांनी बराच मनःस्ताप सहन केला आहे. आता उद्रेक होण्याची वाट महापालिका प्रशासनाने न पाहताच तातडीने याची दखल घेणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com