साहेब, लेकाला बरं करा.. नाही तर मारून टाका!

साहेब, लेकाला बरं करा.. नाही तर मारून टाका!

कोल्हापूर - दुष्काळग्रस्त मित्राने घर बांधण्यासाठी म्हैस विकली म्हणून त्याच्या मदतीला धावून जाऊन अनिलने दिवसरात्र एक करून घर दुरुस्तीचे बांधकाम पूर्ण केले. शेवटच्या दिवशी छपरावर काम करताना घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला त्याच्या हातातील पाईपचा स्पर्श झाल्याने त्याला शॉक लागून तो छपरावरून खाली कोसळला. त्याचा मणका निकामी झाला. गेले चार-पाच महिने त्याच्या आईने अनेक हॉस्पिटलचे उंबरे झिजवलेत. गेला दीड महिना सीपीआरमध्ये असलेला अनिल तळमळत आहे. आता येथे उपचार कसे करणार? त्याला घरी घेऊन जा.. त्याची सेवा करा... असा डॉक्‍टर, नर्सनी सल्ला दिल्याने मातेचे काळीज हलले. अनिलला अशा अवस्थेत घरी नेऊन काय करायचे? असा यक्ष प्रश्‍न माऊलीसमोर आहे. ‘घरदार विकून दवाखान्यांची बिले भागवलीत. आता पैसे कोठून आणू? असा प्रश्‍न करीत ‘डॉक्‍टरसाहेब, तुम्हीच त्याला जगवा.. नाहीतर मारून टाका..’ असे माऊलीचे शब्द ऐकून हॉस्पिटल प्रशासनच कोड्यात पडले आहे. कर्नाटकातील शमनेवाडी (ता. चिकोडी) येथील अनिल रामदास गारवे हा गवंडी काम करणारा तरुण. घराचे बांधकाम पूर्ण करून छपरावरून उतरताना मुख्य वाहिनीचा शॉक लागून तो खाली कोसळला.

गावकऱ्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे लाखावर बिल झाले. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून पैसे भागवले. त्यानंतर पैशाची जोडणी होत नसल्याने अनिलला घरी नेण्याचा निर्णय आई व पत्नीने घेतला; पण एक रात्रच घरी ठेवता आले. अंगाची लाही होत होती. पाठीतून येणारी कळ झोपू देत नव्हती, म्हणून पुन्हा कोल्हापुरात दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथेही अतिदक्षता विभागात दहा-बारा दिवसांनंतर सव्वा लाखावर बिल गेले. काही दानशूर व्यक्ती आणि नातलगांनी मदतीचा हात दिला. हॉस्पिटलनेही बिल निम्मे केले. त्यानंतर मिरजेतील हॉस्पिटलमध्ये उपचाराला दाद मिळेल, असे वाटले. परंतु, तेथेही पुन्हा तीच परिस्थती आली. त्यामुळे अखेर २२ मे रोजी सीपीआरमध्ये दाखल केले. तेव्हापासुन झोपून असलेला अनिल केवळ बोलू शकतो. एखादा माणूस भेटायला गेल्यावर त्याच्या डोळ्यात दिसणारी चमक येणाऱ्यांना अस्वस्थ करून जाते. त्याच्या मणक्‍यावर उपचार करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार अपेक्षित आहेत; पण त्याची घरची परिस्थिती दयनीय आहे. सरकारी दवाखाना असूनही औषधांसाठी दहाबारा हजार रुपये खर्च झालेत. आता पैसे कोठून आणायचे? असा यक्ष प्रश्‍न अनिलच्या आई आणि पत्नीपुढे आहे. ‘घरी घेऊन जा, सेवा करा’ असा सल्ला नर्स आणि काही डॉक्‍टरांनी बोलता बोलता दिला; पण अनिलला आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. त्यांना कसे सांभाळायचे हा ही प्रश्‍न असल्याने आता करवीरवासीयांसमोर मदतीसाठी पदर पसरला आहे. यातून आधार मिळून अनिल बाहेर पडला तर या मातेला वृद्धापकाळाचा आधार लाभणार आहे.

कर्नाटकातून अतिशय क्रिटिकल परिस्थितीत पेशंट आणला होता. सध्या त्याच्या मणक्‍याला गंभीर दुखापत आहे. बेड सोर्स होत आहेत. आम्ही शक्‍य तितके प्रयत्न करतोय. त्याने बरे होऊनच घरी जावे, असे सर्वांना वाटत आहे. त्याची आई व पत्नी करत असलेली सेवा कौतुकास्पद आहे.

- डॉ. हरीष पाटील,  वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com