उठाव आहे; पण विल्हेवाट शून्य 

उठाव आहे; पण विल्हेवाट शून्य 

कोल्हापूर - शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कचऱ्याचा नियमित उठाव केला जातो; पण उठाव केलेला कचरा थरावर थर रचण्याचे काम सुरू आहे. दररोज 180 टन कचऱ्याचा ढीग टाकण्याचे काम झूम प्रकल्पाच्या ठिकाणी केले जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नसल्याने झूम प्रकल्पाच्या जागेत नुसते कचरा ओतण्याचे काम सुरू आहे. यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छता मोहिमेच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असला तर नुसती स्वच्छता उपयोगी नाही, तर कचऱ्याच्या विल्हेवाटीचा निकष लावल्यास शहराचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये जाण्याची स्थिती आज दिसत आहे. 

शहरात गोळा होणारा घनकचरा आणि त्याची विल्हेवाट ही गंभीर समस्या बनत चालली आहे. शहरातील कचऱ्याचा महापालिकेच्या वतीने रोज उठाव केला जातो. नागरिकांची ओरड नको, नगरसेवकांचा दबाव म्हणून स्वच्छता राखण्यासाठी कचऱ्याचा उठाव नियमित केला जातो; परंतु कचऱ्याचा उठाव केल्यावर तो कचरा एकत्रित केवळ डंपिंग करण्याचे काम दररोज केले जाते. कचऱ्याच्या प्रश्‍नावर केवळ स्वच्छता झाली म्हणजे सगळे झाले, म्हणणे चुकीचे ठरवणारे आहे. कचऱ्याचा उठाव आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महापालिकेवर निश्‍चित केली आहे; परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीच यंत्रणा महापालिकेकडे नाही. 

गोळा होणारा कचरा झूम प्रकल्पाच्या ठिकाणी रोज ओतला जातो. त्या ठिकाणी एकमेकावर थप्पी रचण्याचे काम केले जात आहे. कचऱ्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचऱ्यामुळे या ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला करून निष्पाप मुलांचा जीव घेतला आहे तर अनेकांना जखमी केले आहे. याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. परिसरातील जमिनीमध्ये विशिष्ट पद्धतीची घातक द्रव्ये तयार होत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट म्हणजे कचरा पेटवून देणे, अशी अघोरी पद्धत सध्या राबवली जाते. कचरा पेटवून दिल्यानंतर या परिसरातील नागरिकांना दुप्पट त्रास सहन करावा लागतो. 

टाकाळा खणीमध्ये कचरा टाकण्याचे नियोजन होते, ते थांबले आहे. टोप येथील जागा कचऱ्यासाठी ताब्यात घेण्याचा प्रश्‍न लटकला आहे. या सगळ्याचा विचार करून आता स्वच्छता झाली म्हणजे झाले नसून कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत. 

खासगी संस्थांचा पुढाकार 
शहरातील काही प्रभागांत खासगी संस्थांनी पुढाकार घेऊन ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. सहा प्रभागांत हे काम सुरू आहे. कचरा गोळा करून त्यापासून खत तयार करण्याचे काम सध्या केले जात आहे. महापालिकेने अशा संस्थांच्या माध्यमातून जरी प्रयत्न केला तरी कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 

सद्यस्थिती 
घंटागाड्या - 200 
कामगार - 1600 
दररोज गोळा होणारा कचरा - 180 टन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com