Kolhapur-Honey
Kolhapur-Honey

अस्सल कोल्हापुरी मध जाणार परदेशात

कोल्हापूर - ना काकवीची भेसळ, ना कुठल्या कृत्रिम पदार्थाची मिलावट. गगनबावडा, शाहूवाडी या डोंगरी भागातील मधमाशांच्या पोळ्यातील अवीट गोडीचा मध वनखात्याच्या वनामृत ब्रॅंडखाली आता परदेशांत विकला जाणार आहे. वन खात्याच्या प्रयत्नाने या मधाला देशासह परदेशांतही बाजारपेठा उपलब्ध होतील. यासोबतच ‘वनामृत’ या ब्रॅंडखाली या डोंगराळ तालुक्‍यांतील विविध २४ पदार्थ विकले जाणार आहेत. 

प्रचंड पाऊस, बहुतांश गावे जंगलांमध्ये विसावलेली. भात, नाचणी आणि तुरळक ऊस वगळता अन्य पिके नाहीत. अशा डोंगराळ तालुक्‍यांमध्ये वन खात्याने एक पथदर्शी प्रकल्प राबवला. येथील करवंदे, फणस, भोकर या फळांपासून विविध रुचकर पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण महिला बचतगटांना दिले. त्यांच्याकडून हे पदार्थ बनवून घेतले. अत्यंत आकर्षक पद्धतीने त्यांचे पॅकिंग केले. या सर्व पदार्थांचा वनामृत हा ब्रॅंड बनविला. या ब्रॅंडच्या अंतर्गत या सर्व पदार्थांची विक्री देशात व परदेशांतही केली जाणार आहे. 

या उत्पादनांमध्ये मधाचाही समावेश असून, हा मध पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने संकलित केला आहे. येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेट्या ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये मधमाशांनी पोळे केले. या पेटीतील नैसर्गिक मध संकलित करून तो पॅकबंद केला गेला. या वर्षी सुमारे ४ टन मधाचे संकलन झाले आहे.

यामध्ये कोणतीही भेसळ नाही. त्यामुळे हा अस्सल मध अवीट गोडीचा बनला आहे. हा मध देशातील मोठ्या बाजारपेठांत तर जाणार आहेच; पण तो निर्यात करण्यासाठी वन खात्याने प्रयत्न केले. त्यातून काही संस्था या मधाला परदेशांत बाजारपेठा मिळवून देणार आहेत. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच हा मध निर्यात केला जाईल. 

वनामृत ब्रॅंडच्या वस्तू आणि पदार्थ उत्तम दर्जाचे आहेत. यातील मध हा अतिशय शुद्ध व नैसर्गिक आहे. अशा मधाला परदेशांतील बाजारपेठांत मागणी असते. निर्यातीची ही संधी लक्षात घेऊन आम्ही प्रयत्न केले. निर्यातीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच वनामृतचा मध परदेशांत जाईल. 
- डॉ. प्रभूनाथ शुक्‍ला, उपवनसंरक्षक

ब्रॅंडच्या वस्तू
फणसाचा जॅम, ज्यूस, वेफर्स, करवंदांचे सरबत, लोणचे, भोकराचे लोणचे; मध, भाताच्या स्थानिक जाती, तमालपत्र, शिकेकाई, सेंद्रिय खते, कागद व कापडी पिशव्या, दंतमंजन, आंबा लोणचे. 

महिलांना मिळाला रोजगार
हे पदार्थ बनवण्यामध्ये शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्‍यांमधील १७ गावांतील ६०० महिलांचा सहभाग होता. वनामृत ब्रॅंडच्या माध्यमातून या महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com