कोल्हापूर ‘मनपा’ शाळांचा पॅटर्न साताऱ्यात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

शिक्षकाने सेवापरायणता जपली तर ‘मनपा’ आणि ‘झेडपी’च्या शाळाही गुणवत्तापूर्ण करता येऊ शकतात, याचा अनुभव जरगनगर शाळेत काम करताना घेतला होता. याच अनुभवांची शिदोरी भविष्यातही उपयुक्त ठरणार आहे.
- जमीर पठाण, शिक्षक, कारळे प्राथमिक शाळा

कोल्हापूर - शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेत येथील महापालिकेच्या शाळाही गेल्या पाच वर्षांत ताकदीने उतरल्या असून, गुणवत्तेच्या जोरावर यंदा उन्हाळी सुटीपूर्वीच वीसहून अधिक शाळांना ‘ॲडमिशन क्‍लोज’चा फलक लावावा लागला आहे. काही शाळांत वर्गखोल्याच कमी पडणार असून, उन्हाळी सुटीत स्थानिक नागरिक, विविध संस्था आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून वर्गखोल्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध नवोपक्रमांची येथील जरगनगर शाळेतील प्रेरणा घेऊन जमीर पठाण या शिक्षकाने आता पाटण तालुक्‍यातील कारळे जिल्हा परिषदेची शाळा ‘आयएसओ’ मानांकित केली आहे. या निमित्ताने येथील मनपा शाळांचा पॅटर्न आता सातारा जिल्ह्यातही पोचला आहे. 

महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांत जरगनगर विद्यालयाने पहिल्यापासूनच वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक वर्षी येथे प्रवेशासाठी झुंबड उडते आणि त्याचमुळे वर्गखोल्याही कमी पडतात, अशी स्थिती आहे. याच शाळेला गुणवत्तापूर्ण बनवताना शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून देण्यात श्री. पठाण यांचे योगदानही मोठे आहे. ते मूळचे इंदापूरचे. २००९ मध्ये त्यांची जरगनगर शाळेत नेमणूक झाली आणि त्यानंतर चार वर्षे ते या शाळेत कार्यरत होते. सातवीचे दहा विद्यार्थी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आणले. २०१३ ला अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत त्यांचे नाव आले आणि त्याची बदली सातारा जिल्ह्यात झाली. पाटण तालुक्‍यातील कारळे हे गाव सह्याद्रीच्या कुशीतील डोंगराळ भागातले. साडेपाचशे लोकवस्तीचे हे गाव. आजही या गावात एस.टी. पोचलेली नाही. वडाप आहे ते पण दिवसातून एकदाच. आजूबाजूच्या चार वाड्या-वस्त्यांवरील मुलं या शाळेत शिकतात. श्री. पठाण यांनी शाळेत अध्यापन करताना ‘जरगनगर पॅटर्न वापरला. मे महिन्यापासूनच शिष्यवृत्तीसाठी जादा तास, दीडशेहून अधिक सराव चाचण्या, पन्नासहून अधिक नवोपक्रम, आनंददायी शिक्षणासाठी बोलक्‍या भिंती, बोलके वर्ग, प्रत्येक महिन्यात किमान एक इको-फ्रेंडली उपक्रम, संगीतमय आदर्श परिपाठ अशा विविध संकल्पना त्यांनी तेथे राबवल्या आणि सहा महिन्यांपूर्वी शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यासह शाळेतील चार शिक्षकांनीही त्यांच्याबरोबरीने काम केले. गुरुवारी याबाबतचे सर्व परीक्षण पूर्ण झाले आणि आता चार दिवसांत याबाबतचे अधिकृत मानांकन ऑनलाइन जाहीर होणार आहे. 

Web Title: Kolhapur municipal school Pattern of schools in Satara