पवार, आकोळकरची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस - विश्‍वास नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार व सारंग आकोळकर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले. हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

नांगरे पाटील म्हणाले, की पानसरे यांच्या हत्येचा तपास "एसआयटी' मार्फत सुरू आहे. सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड व संस्थेशी निगडित असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे यांना पोलिसांनी अटक केली. तपासात सनातन संस्थेचा साधक विनय बाबूराव पोवार (रा. उंब्रज, ता. कराड, सातारा) आणि सारंग दिलीप आकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) याचा सहभाग असल्याचे पुढे आले. त्यांचा शोध विविध पथकांद्वारे सुरू आहे.

त्या दोघांविरोधात जिल्हा न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट घेतले आहे. विनय पवार व आकोळकर या दोघांबाबत माहिती देणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. संबंधितांबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

'पवार व आकोळकर यांना फरारी घोषित करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाबाबत काहीही बोलता येत नाही. या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते उपस्थित होते.

माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा...
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे - 020 - 25634459
अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय - 0231 - 2656163
पोलिस उपनिरीक्षक रमेश ढाणे - 9823502777
टोल फ्री क्रमांक - 100