श्‍वानदंशाचे रोज येतात ४० रुग्ण...

श्‍वानदंशाचे रोज येतात ४० रुग्ण...

कोल्हापूर - आठवड्याभरात पिसाळलेले कुत्रे चावल्याने दोन बालकांचा मृत्यू झाला. पिसाळलेले कुत्रे चावून गंभीर अवस्थेतील सरासरी ४० जखमी रोज सीपीआरमध्ये येतात. त्यांच्यावरील रेबीज लसीसह उपचाराचा खर्च वर्षाकाठी जवळपास एक कोटी रुपये होतो. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात होणारी चाल-ढकल व प्राणिसंवर्धन कायद्यातील अडचणीं यांमुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव जिवघेणा व तितकाच खर्चीक बनला आहे.  

पिसाळलेले कुत्रे चावल्यावर उपचारात हयगय झाली, तर रेबीज होतो, रेबीजमुळे मृत्यू ओढवतो. यावर उपाय म्हणून कुत्रे चावल्यापासून अवघ्या काही तासात रेबीज प्रतिबंधक इंजेक्‍शन घ्यावे लागते. पिसाळलेल्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण शहरात, तसेच जिल्हाभरात वाढले. अनेकदा हे हल्ले जिवघेणे असतात. शरीराच्या अनेक भागांवर जखमा होतात. जखमी गंभीर स्थितीत ‘सीपीआर’कडे उपचारासाठी येतात. काहीजण कुत्रा चावल्याने खासगी रुग्णालयात इंजेक्‍शन घेण्यासाठी मोठा खर्च येतो; म्हणून थेट ‘सीपीआर’मध्ये घेतात. दिवसाला ४० रुग्ण रेबीज प्रतिबंधक लस घेतात. 

खरकट्या अन्नावर पोसतात मोकाट कुत्री 
शहरभरात कचरा टाकण्याची यंत्रणा सक्षम नाही. बहुतेक गल्ल्यांत उघड्यावर खरकटे टाकले जाते. अशात हॉटेल, चहा-नाश्‍त्याच्या गाड्या जागोजागी आहेत, त्यातून प्रत्येक कोपऱ्यावर खरकटे अन्नपदार्थ उपलब्ध होतात, तिथे मोकाट कुत्र्यांचे वास्तव्य असते. 

नदी, ओढ्याकाठी मृत प्राणी खाण्यासाठी येणाऱ्या कुत्र्यांचे कळप आहेत. सतत मांस खावून; हाडे तोडून हिंस्र बनलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या रमणमळा, बावडा, बापट कॅम्प, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत या भागांत आहेत. अशी हिंस्र कुत्री हॉकी स्टेडियम, राजेंद्रनगर, सुर्वेनगर, संभाजीनगर, रंकाळावेस, लक्षतीर्थ वसाहत भागांतही आहेत.  

महापालिकेचा निरुत्साह   
पाच वर्षांत प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्री शहरात वाढली आहेत. महापालिकेला अनेकजण कळवितात. महापालिका आरोग्य विभाग सांगतो, की कुत्रे कायद्यानुसार मारता येत नाहीत, आम्ही पकडू शकतो; पण पकडण्यासाठी माणसं नाहीत. निर्बीजीकरणाची चर्चा महासभेत झाली; पण पुढे काही झाले नाही, तर दुसरी बाब अशी, की महापालिकेचे दवाखाने सर्वच भागांत सक्षमपणे चालत नाहीत. त्यामुळे श्‍वानदंशाचे बहुतांश जखमी सीपीआरमध्ये येतात.

 कुत्रे चालवल्याने त्यावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या जखमींची संख्या वाढती आहे. कोणास रेबीज झाला, तर त्यांच्यावर येथे उपचार केले जातात. वर्षभरात किमान २ ते ३ व्यक्तींचा मृत्यू रेबीजमुळे होतो. आमच्याकडे येणाऱ्या जखमी व रुग्णावंर तातडीने उपचार केले जातात.
-डॉ. शिशिर मिरगुंडे, सीपीआर.

पिसाळलेले कुत्र्याच्या जिभेला लकवा मारतो. घशातील स्नायू लुळे होतात, सतत जबडा उघडा राहतो. लाळ गळते.
पिसाळलेला कुत्रा एका जागी बसतो किंवा इतरत्र हुंदडतो. तेव्हा तो कोणाचाही चावा घेतो. त्याच्यापासून दूर राहणे, हाच उपाय. पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेतून रेबीजचा संसर्ग होऊ शकतो. 
  - डॉ. सॅम लुड्रीक, पशुवैद्यकीय अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com